UNSC : 'दहशतवादी' पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष, 193 पैकी 182 देशांचा पाठिंबा; भारताची डोकेदुखी वाढली
Pakistan UNSC President : भारताने सिंधू पाणी वाटप करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी पाकिस्तान UNSC चा अध्यक्ष होणे ही भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई : अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि चीनच्या जीवावर माजलेल्या पाकिस्तानमुळे भारताची आता डोकेदुखी वाढली आहे. यावेळी त्याला निमित्त म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद. संयुक्त राष्ट्राचे सर्वात महत्त्वाचं अंग असलेल्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षपदी पाकिस्तानची निवड झाली आहे. 193 पैकी 182 देशांचा पाठिंबा मिळवून पाकिस्तान या पदावर विराजमान झाला. दहशतवादाला पोसणारा पाकिस्तानच संयुक्त राष्ट्रामध्ये आता महत्त्वाच्या स्थानावर गेल्यामुळे भारताची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मंगळवारी (1 जुलै) हाती घेतली आहेत. याआधी जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानची दोन वर्षांसाठी UNSC चा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली होती. आता 193 सदस्यांपैकी 182 सदस्यांचा पाठिंबा मिळवत पाकिस्तान सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. पाकिस्तानची ही निवड जुलै महिन्यासाठी असणार आहे.
पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांच्या नेतृत्वात आता UNSC मध्ये जुलै महिन्यातील महत्त्वाच्या चर्चांची दिशा ठरवली जाणार आहे. पाकिस्तानने ही नवी जबाबदारी 'भू-राजकीय पारदर्शकता, समावेशकता' या तत्त्वांवर आधारलेली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बैठकींचा कार्यक्रम
- 22 जुलै: 'बहुपक्षीयतेद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा' या विषयावर खुली चर्चा.
- 24 जुलै: 'संयुक्त राष्ट्रे आणि इस्लामिक सहकार्य संघटना यांमधील सहकार्य' या विषयावर विशेष अधिवेशन.
- या दोन्ही बैठकींचे अध्यक्षस्थान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार भूषवतील.
दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताचा आक्षेप
एकीकडे हे पद मिळवण्यासाठी पाकिस्ताने मोठा आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवला. तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली. 'दहशतवादाला पोसणारा देश' असं म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर टीका केली. जेव्हा एखादा देश आपल्या शेजारी देशाविरुद्ध दहशतवादाला पाठीशी घालतो, तेव्हा तो केवळ एकाच देशासाठी नव्हे, तर संपूर्ण जागतिक सुरक्षेसाठी धोका असतो अशा शब्दात एस जयशंकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
भारताने अलीकडेच पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. तसेच सिंधू पाणी करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची UNSC अध्यक्षपदी निवड होणे हे अनेक भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी अडथळ्याचं ठरू शकते.
UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कशी असते?
- 15 देश सदस्य
- 5 स्थायी सदस्य (अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम)
- 10 अस्थायी सदस्य (भारत आणि पाकिस्तानसह इतर 8 देश)
- अस्थायी सदस्यांची निवड दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी.
ही बातमी वाचा:























