BMC Election 2026 MNS: भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
Raj Thackeray MNS BMC Election 2026: राज ठाकरे यांच्या मनसेला सध्या मुंबईत एकापाठोपाठ मोठे धक्के बसताना दिसत आहेत. मनसेचे कार्यकर्ते शिंदे गट आणि भाजपमध्ये जात आहेत.

Raj Thackeray MNS BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना भाजप आणि शिंदे सेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते आणि कार्यकर्त्यांना गळाला लावायला सुरुवात केली आहे. कालच दादरमधील मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशाला काही तास उलटत नाही तोच मंगळवारी संध्याकाळी मुंबई उपनगरातील अंधेरी परिसरात शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी राज ठाकरेंच्या पक्षाला मोठे खिंडार पाडले. येथील मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का बसला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात पक्षप्रवेश केला. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने अंधेरीत मनसे पक्ष खिळखिळा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता या भागातील मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांची फौजच शिंदे गटात जाणे, हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, कालच प्रभाग क्रमांक 192 मधील शिवसेना शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकारने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता.
तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तसेच नाशिकमधील माजी आमदार नितीन भोसले यांनीही एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला होता. विशेष म्हणजे, नितीन भोसले यांनी 10 दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या आठवडाभरात त्यांनी पुन्हा पक्ष बदलत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडले होते.
Nashik MNS: नाशिकच्या राजकारणाला कलाटणी दोन माजी महापौरांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दशरथ पाटील महापौर असताना पार पडलेल्या नाशिक कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख करत, “कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य आयोजनाचे नियोजन, प्रशासनाशी समन्वय आणि जनतेच्या सोयीसुविधांचा अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का देत मुंबईतील मनसेचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. मनसेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ॲड. देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर आणि संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत, “शिवसेना ही केवळ पक्ष नसून सर्वसामान्य जनतेसाठी लढणारी चळवळ आहे. नव्याने दाखल झालेले हे सर्व सहकारी संघटन मजबूत करतील आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करतील,” असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, तसेच शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व नेत्यांनी यावेळी बोलताना, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विकास, निर्णयक्षमता आणि सामान्य माणसाच्या हितासाठी ठामपणे उभी आहे. हाच विश्वास आम्हाला येथे घेऊन आला,” अशी स्पष्ट भूमिका मांडली. या धडाकेबाज पक्षप्रवेशामुळे नाशिकसह मुंबईतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Santosh Dhuri: मुंबईत मनसेचे सात-आठ नगरसेवकही निवडून येण्याची खात्री नाही: संतोष धुरी
मुंबईत मनसेला 52 जागा सोडल्याचे दिसत आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा 8 जागा निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या मराठा माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेची फक्त एका जागेवर बोळवण करण्यात आली. ठाकरे गटाने त्यांना ज्या सीट सोडायच्या होत्या, त्याच मनसेला दिल्या, असे संतोष धुरी यांनी म्हटले.
आणखी वाचा
आता इकडे राहण्यात काय अर्थ...; संतोष धुरी यांनी विचारताच संदीप देशपांडे म्हणाले...























