Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या एअर स्पेसमधून कोणतंही विमान गेलं तर..., शहबाज शरीफ सरकारचा भारताला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न
Pahalgam Terror Attack : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाच मोठे निर्णय घेत दणका दिला आहे. यानंतर पाकिस्तान सरकारनं भारताला इशारा दिला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. भारतानं यानंतर पाकिस्तानला मोठा दणका दिला होता. भारतानं पाकिस्तानच्या दिल्लीतील दूतावासातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले.काही दिवसांसाठी सिंधू जल करार स्थगित आणि अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात आला आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्ताननं एअर स्पेस संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्ताननं भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यावसायिक फ्लाइटससाठी एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या शहबाझ शरीफ सरकारच्या निर्णयानुसार भातीय फ्लाइटससाठी पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नसेल. शहबाझ शरीफ यांनी गुरुवारी 24 एप्रिल 2025 ला एक उच्च स्तरीय बैठक देखील बोलावली होती.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी बुधवारी रात्री एका खासगी वाहिनीसोबत बोलताना भारतानं घाई गडबडीत निर्णय घेतल्याचं म्हटलं. पहलगाम हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला.नरेंद्र मोदींनी भारतात परत येताना त्यांच्या विमानानं पाकिस्तानच्या एअर स्पेसचा वापर केला नव्हता. मात्र, सौदी अरेबियाला जाताना नरेंद्र मोदी यांच्या विमानानं पाकिस्तानच्या एअर स्पेसचा वापर केला होता. याशिवाय पाकिस्ताननं भारतासोबतचा शिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भारतीय नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघा बॉर्डर देखील बंद राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल सीसीएसची बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यात आला. अटारी बॉर्डर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्यात आला.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कलाकार फवाद खान याचा अबीर गुलाल हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार नाही. सोशल मीडियावरुन अनेकांनी यासंदर्भात मागणी केली होती. अखेर माहिती व प्रसारण मंत्रालयानं फवाद खानच्या अबीर गुलाल संदर्भात निर्णय घेतला असून सिनेमा भारतात प्रदर्शित होणार नाही, असं म्हटलं आहे.



















