Video: न्याय द्या, न्याय द्या... मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सोलापुरात तरुणाचा गोंधळ; लेकीसाठी आईच्याही डोळ्यात अश्रू
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना अचाकन एक तरुण, मला न्याय द्या, न्याय द्या.. असे म्हणत कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसून आला.

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते आज सोलापूर ते मुंबई या विमानसेवेचं लोकार्पण होत असून सोलापुरातून मुंबईसाठी पहिलं प्रवासी विमान उड्डाण करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी हवाई वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात (Solapur) कार्यक्रमाचे आयोन करण्यात आले होते. त्यामध्ये, जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी न्याय द्या न्याय द्या अशी घोषणाबाजी करत एक व्यक्ती कार्यक्रमात घुसला होता. त्यावेळी, पोलिसांनी (Police) संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून आपल्या बहिणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आई आणि मुलगा दोघेही कार्यक्रमस्थळी येऊन न्यायाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना अचाकन एक तरुण, मला न्याय द्या, न्याय द्या.. असे म्हणत कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसून आला. त्यावेळी, पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेत बाहेर काढलं. मात्र, या तरुणासोबत त्याची आई देखील न्यायाची मागणी करण्यासाठी आल्याचं दिसून आले. पोलिसांनी माय-लेकास पोलीस जीपमध्ये घालून ठाण्यात नेले.
दरम्यान, पंकज मारुती जिंदम असे कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो त्याच्या आईसह कार्यक्रमस्थळी पोहोचला होता. पंकज याच्या बहिणीचा 15 ऑगस्ट 2025 रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांच्या नोंद नुसार ही आत्महत्या असल्याचे नमूद आहे. मात्र, सासरच्या मंडळीने छळ करुन हत्या केल्याचा आरोप तरुणाचा आणि त्याच्या आईचा आहे. त्यामुळे, आपल्याला न्याय मिळाव, याचं मागणीसाठी हा तरुण हा मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडे दाद मागण्यासाठी, भेटीसाठी आला होता. मात्र, तिथपर्यंत पोहोचता येत नसल्याचे लक्षात येताच त्याने न्याय द्या, न्याय द्या.. अशी घोषणाबाजी केली.
बहिणींना दिवाळीची भाऊबीज देण्याचं काम केलं - पालकमंत्री गोरे
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात म्हटले की, विरोधक म्हणायचे, गॅरेंटीने विमानसेवा सुरू होणार नाही. पण, गँरंटी देऊन विमानसेवा सुरु करणारा, शहराचा विकास करणारा मुख्यमंत्री आज आहे. सोलापूरवर मोठं संकट उभं राहिलं, अतिवृष्टी-पूर सगळं नुकसान करून गेलं. इतक्या मोठ्या संकटात आपल्या प्रशासनाने आपल्या नेतृत्वात काम केलं. पण या भयानक परिस्थितीत पुरामुळे एकही व्यक्ती दगावाला नाही, याचं आम्हाला समाधान आहे, असे जयकुमार गोरे यांनी म्हटलं. शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे, काही विरोधकांनी दोन तासात पाहणी दौरा केला. 10 हजार कोटींचे पॅकेज देण्याची मागणी या विरोधकांनी केली. पण, तुम्ही 31 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. आम्ही सरकार म्हणून पूरग्रस्त, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत. प्रशासनाच्यावतीने आम्ही दिवाळी सुखाची जावी, यासाठी आम्ही दिवाळी गोड करण्यासाठी आमच्या बहिणींना दिवाळीच भाऊबीज देण्याचे काम केल्याचंही जयकुमार गोरे यांनी म्हटलं.

























