ठाकरे बंधू ते जयंत पाटील ते बाळासाहेब थोरातांनी धडाधड पुरावे मांडले; निवडणूक आयोगाच्या कारभाराची पोलखोल, मतदारयादीमधील घोळ समोर आणला
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना थोरात यांनी बोगस मतदारांवरून गंभीर आरोप केला.

ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोग (केंद्रीय आणि राज्य) आणि मतदारयादीमधील दोषांबाबत गंभीर मुद्दे उपस्थित यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. विधानसभेला ज्या मतदारयाद्या होत्या त्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये सांगूनही त्या दोषांसह निवडणूक पार पडल्याचे थोरात म्हणाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना थोरात यांनी बोगस मतदारांवरून गंभीर आरोप केला. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला, आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. एकत्रित बैठक केली. परंतु, आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे उत्तर आम्हाला दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे, असे थोरात म्हणाले.
विधानसभेला घोटाळे केलेली मतदारयादी होती
बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही नावे वगळली गेली. काहींचे परत परत नावे दिसत आहेत. एका घराच्या नावावर अनेक आहेत. थोरात यांनी सांगितलं की, "माझं एखाद कॉलेज आहे किंवा माझ कॉलेज हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले आलेली मुलं सुद्धा माझे मतदार असं होणार असेल. निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत तक्रार करूनच त्याची दखल नाही. अशा स्थितीत अनेक घोटाळे करून केलेली मतदारयादी विधानसभेची होती.
आता आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ती मतदार यादी एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिली. यादी दिल्यानंतर कोणतही पुनर्विलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलं नाही. कोणत्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत. पुन्हा नवीन नाव नोंदण्यासाठी मोहीम करण्यात आली नाही. ते म्हणाले की, सगळ्या दोषांसहित एक जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिली आहे. जे चुकीच आहे ते दुरुस्त केलं पाहिजे होतं, पण ते केलेलं नाही. ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची असूनही त्यांनी काहीच केलेलं नाही. आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही.
पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे
या घोळामध्ये दोष असलेली पूर्णपणे यादी मतदानाला जाणार आहे. ही काय निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही. या सर्व बाबींवर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही, अशी अवस्था आहे. या सर्व दोषांसहित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीच आहे आणि जनतेला मान्य नाही. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा तोच उद्धवस्त करण्यात निघालेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे अस आम्हाला वाटतंय, असा आरोपही त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या

















