(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओमिक्रॉन फैलावतोय! अमेरिका, UAEसह 25 देशांमध्ये संसर्ग, पाहा यादी
Omicron Variant in world : कोरोना नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग जगभरात फैलावत असून आतापर्यंत 25 देशांमध्ये हा व्हेरियंट आढळला आहे.
कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग जगभरात फैलावत आहे. आता अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्येही ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी एक बाधित आढळला आहे. जगातील 25 देशांमध्ये ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत.
कॅलिफोर्नियात आढळला बाधित
अमेरिकेतील एका व्यक्तीला ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, अमेरिकेत कोविड-19 च्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण होणारी ही पहिलीच बाधित व्यक्ती आहे. संसर्गबाधित व्यक्ती 22 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतली होती आणि 29 नोव्हेंबर रोजी त्याला संसर्ग झाल्याचे आढळले. बाधिताचे लसीकरण झाले आहे. मात्र त्याने बुस्टर डोस घेतला नव्हता. बाधित रुग्णामध्ये आजाराची सामान्य लक्षणे आढळून आली आहेत.
आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी
मागील महिन्याच्या अखेरीस अमेरिकन सरकारने आफ्रिकन देशांतील प्रवासावर निर्बंध लागू केले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस यांनी हा विषाणू अनेक देशांमध्ये फैलावला असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतासह इतर देशांनीदेखील दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशांमधील प्रवासावर निर्बंध लागू केले आहेत.
कोणत्या देशांमध्ये आढळले ओमिक्रॉन बाधित?
बोत्सवानामध्ये 19, दक्षिण आफ्रिकेत 77, नायजेरियामध्ये 3, यूकेमध्ये 22, दक्षिण कोरियामध्ये 5, ऑस्ट्रेलियामध्ये 7, ऑस्ट्रियामध्ये 1, बेल्जियममध्ये 1, ब्राझीलमध्ये 3, चेक रिपब्लिकमध्ये 1, फ्रान्समध्ये 1, जर्मनीमध्ये 9 , हाँगकाँगमध्ये 4, इस्रायलमध्ये 4, इटलीमध्ये 9, जपानमध्ये 2, नेदरलँडमध्ये 16, नॉर्वेमध्ये 2, स्पेनमध्ये 2, पोर्तुगालमध्ये 13, स्वीडनमध्ये 3, कॅनडात 6, डेन्मार्कमध्ये 4, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रत्येकी एक बाधित आढळले आले आहे.
इतर महत्त्वाची बातमी:
Omicron Variant : ओमिक्रॉनची अमेरिकेलाही धास्ती; राष्ट्रपती जो बायडन म्हणाले...