China : चीनमध्ये शास्त्रज्ञांना सापडली 10 लाख वर्ष जुनी मानवी कवटी, अनेक रहस्य उलगडणार
Million Year Old Skull Found : चीनमधील पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्खननात मानवी कवटी सापडली आहे. ही कवटी 10 लाख वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे.
Chinese Archaeologists Found Human Skull : मानवाबाबत अनेक रहस्य उलगडणार आहेत. चीनमधील पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्खननात मानवी कवटी सापडली आहे. ही कवटी 10 लाख वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. ही कवटी चांगल्या स्वरुपात आहे, त्यामुळे यामधून मानवाच्या उत्क्रांतीबाबत अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनमधील हुबेई प्रांतामध्ये ही प्राचीन मानवी कवटी सापडली आहे. ही कवटी मानवाच्या उत्पत्तीचा मोठा पुरावा असल्याचं म्हटलं जात आहे. या मानवी कवटीवर संशोधन केल्यानंतर प्राचीन काळातील मानवाचं जीवन आणि अनेक रहस्यांवरील पडदा बाजूला होईल.
याच ठिकाणी 30 वर्षाआधी सापडली होती कवटी
पुरातत्व विभागाच्या पथकाला आता सापडलेली ही कवटी जुन्या पाषाण युगातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत अभ्यास केल्यावर संशोधकांना मोठी मदत होऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुमारे 30 वर्षाआधी याच ठिकाणी उत्खननात दोन मानवी कवट्या सापडल्या होत्या. एक कवटी 1989 साली आणि दुसरी कवटी 1990 मध्ये सापडली होती. मात्र, या दोन्ही कवट्यांची स्थिती अत्यंत वाईट होती. पण आता सापडलेली ही कवटी पूर्णपणे चांगल्या परिस्थिती आहे. त्यामुळे यातून अनेक नव्या बाबी समोर येतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
10 लाख वर्षे जुनी मानवी कवटी
हुबेई इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल रिलीक्स अँड आर्कोलॉजीचे पुरातत्व संशोधक लू चेंगक्यु यांनी सांगितलं की, आता सापडलेली ही मानवी कवटी पूर्वीच्या दोन कवट्यांसारखीच आहे. या तीन कवट्या ज्या लोकांच्या आहेत ते एकाच काळातील असतील, असं मानलं जात आहे. पुरातत्व उत्खननात सामील असलेले मुख्य पुरातत्व शास्त्रज्ञ जाओ शिंग यांनी स्थानिक माध्यमांना माहिती दिली की, एक दशलक्ष वर्ष जुने मानवी जीवाश्माचे अवशेष आढळले आहेत. चीनसह संपूर्ण पूर्व आशियामध्ये सुमारे 1.2 दशलक्ष वर्षांपूर्वी युआनमोउ मॅन (Yuanmou Man) आणि लॅन्टियन मॅन (Lantian Man) अस्तित्वात होते.
प्राण्यांचे अवशेष आणि लोखंडी शस्त्रेही सापडली
पुरातत्व शास्त्रज्ञांना याच ठिकाणी काही प्रकारच्या प्राण्यांचेही जीवाश्म सापडले आहेत. यातील काही प्राणी मांसाहारी तर काही शाकाहारी असावेत, असा अंदाज आहे. यासोबतच उत्खननादरम्यान काही लोखंडी हत्यारेही आढळून आली आहेत. त्या काळातील मानव या शस्त्रांचा वापर शिकारीसाठी किंवा प्राण्याला खाण्यापूर्वी त्यांचे तुकडे करण्यासाठी करत असल्याचा अंदाज पुरातत्व शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.