(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Medicines: आता कच्च्या तेलाऐवजी कागदाच्या रद्दीपासून बनणार पेनकिलर? जाणून घ्या वैज्ञानिकांचं अनोखं संशोधन
Paper Waste Medicines: कच्च्या तेलाऐवजी कागदाच्या रद्दीपासाून पेनकिलर औषधं बनवण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी केला आहे.
Paper Waste Medicines: वैज्ञानिकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, किरकोळ आजारांत वापरली जाणारी किंवा वेदनाशामक औषधं (Painkillers) आता कागदाच्या रद्दीपासून तयार केली जाऊ शकतात. एका अभ्यासानुसार, पॅरासिटॅमॉल (Paracetamol) आणि आयबुप्रोफेन (Ibuprofen) सारखी सामान्य औषधं आता कच्च्या तेलाच्या उत्पादनांऐवजी पाईनच्या झाडांमध्ये सापडणाऱ्या पदार्थापासून बनवली जाऊ शकतात. कॉमन फार्मास्युटिकल्स औषधं कच्च्या तेलापासून मिळणाऱ्या रासायनिक घटकांचा वापर करून तयार केले जातात. पण टाकाऊ पदार्थांचा वापर करुन आता औषधं बनवली जाऊ शकतात, असं वैज्ञानिकांनी एका अभ्यासात म्हटलं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ बाथच्या रसायनशास्त्र विभाग (University of Bath’s Department of Chemistry) आणि इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनिब्लिटीच्या (Institute for Sustainability) एका संघाने बायोरिन्यूएबल बीटा-पाइनेनपासून फार्मास्युटिकल औषधं तयार करण्याची एक पद्धत विकसित केली. बीटा-पाइनेन (Beta-pinene) हा टर्पेन्टाइनचा (turpentine) एक घटक आहे जो कागदाच्या उत्पादनातून बनलेला टाकाऊ घटक आहे. याचं वर्षाला 3,50,000 टन पेक्षा जास्त उत्पादन होतं.
वैज्ञानिकांनी याच बीटा-पाइनेपासून सामान्यत: वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन पेनकिलरची यशस्वीपणे निर्मिती केली. पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन या गोळ्या टाकाऊ पदार्थांपासून बनवण्यात त्यांना यश आलं, जे दरवर्षी अंदाजे 1,00,000 टन स्केलवर तयार केले जातात.
औषध तयार करण्यासाठी तेलाचा वापर करणं केवळ कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन वाढण्यास हातभार लावत नाही, तर त्यामुळे किंमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचं संशोधक म्हणतात. आपण मोठ्या तेलाचे साठे असलेल्या देशांच्या भू-राजकीय स्थिरतेवर अवलंबून आहोत आणि त्यामुळे औषधांच्या किंमतीमध्ये चढ-उतार होत असल्याचंही संशोधक म्हणतात.तेलाचे साठे संपत आले की औषधं देखील महाग होणार, असं विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधन सहयोगी डॉ. जोश टिबेट्स म्हणाले.
जमिनीतून अधिक तेल काढण्याऐवजी भविष्यात आम्हाला ते ‘बायो-रिफायनरी’ मॉडेलने बदलायचं आहे, असंही ते म्हणाले. रासायनिक उद्योगातील कच्च्या तेल उत्पादनांची गरज बदलण्यात ‘बायो-रिफायनरी’ मॉडेल मदत करू शकते, असं ChemSusChem जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या लेखातही म्हटलं आहे.
टीमने टर्पेन्टाइनपासून इतर रसायनांचं यशस्वीरित्या उत्पादन देखील केलं आहेय ज्यामध्ये4-HAP (4-hydroxyacetophenone) समाविष्ट आहे, जे बीटा-ब्लॉकर्स आणि अस्थमा इनहेलर औषध, साल्बुटामोल, तसेच स्वच्छता उत्पादनं, परफ्यूम आणि इतर गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या औषधांसाठी वापरले जाते.
“आमचं टर्पेन्टाइनवर आधारित बायोरिफायनरी मॉडेल पेपर उद्योगातील टाकाऊ रासायनिक उत्पादनांचा वापर करून मौल्यवान, टिकाऊ रसायनांचा स्पेक्ट्रम तयार करतं, ज्याचा वापर परफ्यूमपासून पॅरासिटामॉलपर्यंतच्या विस्तृत गोष्टींमध्ये केला जाऊ शकतो,” असं देखील डॉ. टिबेट्स म्हणाले.
सध्याच्या स्वरूपातील प्रक्रिया केलेली औषधं तेलापासून तयार करण्यात आलेल्या औषधांपेक्षा अधिक महाग असू शकतात, असं संशोधक संघाने म्हटलं आहे. तरीही ग्राहक पूर्णपणे वनस्पतींपासून उत्पादित झालेल्या आणि अधिक टिकाऊ औषधांसाठी किंचित जास्त किंमत देण्यास तयार असू शकतात, असं देखील संशोधकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: