मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरुन राजकीय वातावरण तापलं असताना दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असा सवाल मविआच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि स्वत: एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्रीपदासाठी (Chief minister) आग्रही आहेत. मात्र, महायुतीमध्ये भाजपला मिळालेलं 132 जागांचं संख्याबळ पाहता मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, हे दिसून येते. त्यातच, भाजप आमदारांकडूनही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी दबावगट तयार केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे.
राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरुन राजकीय वातावरण तापलं असताना दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली असून शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली असून दोन दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, शिंदेंनी पत्रकार परिषद बोलावल्याने ते आपली नाराजी किंवा मुख्यमंत्रीपदाबाबत काय भूमिका मांडतील हे पाहावे लागेल.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुका लढवल्या असून मोठ्या संख्येने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपने 132 जागांवर यश मिळवल्याने भाजप समर्थकांचा उत्साह वाढला आहे. तर, महायुतीला तब्बल 237 जागांवर जय मिळालं असून भाजप 132, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 41 जागा जिंकता आल्या आहेत. त्यातच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती देत मुख्यमंत्रीपदासाठी आपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंची नाराजी जास्त काळ राहिल असं दिसत नाही. कारण, अजित पवार व भाजप यांची एकूण जुळवाजुळव केल्यास बहुमताचा आकडा सहजच पार होत आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा