(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चार्जिंग दरम्यान मोबाईलचा स्फोट, कंपनीच्या सीईओचा मृत्यू
मोबाईल फोन फुटल्याच्या अनेक घटना तुमच्या कानावर आल्या असतील आणि त्यात काहींना जीवघेणी दुखापत तर काहींचा मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मलेशियातही अशीच घटन समोर आली आहे. मोबाईलचा स्फोट होऊन चक्क एका कंपनीच्या सीईओचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : मोबाईल फोन फुटल्याच्या अनेक घटना तुमच्या कानावर आल्या असतील आणि त्यात काहींना जीवघेणी दुखापत तर काहींचा मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मलेशियातही अशीच घटन समोर आली आहे. मोबाईलचा स्फोट होऊन चक्क एका कंपनीच्या सीईओचा मृत्यू झाला आहे. नाजरीन हसन असं मृत्यू झालेल्या सीईओचं नाव आहे.
हसन यांच्याकडे ब्लॅकबेरी आणि हुवाई असे दोन मोबाईल होते. मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर घरातील गाद्यांनी आणि कापडी वस्तूंनी पेट घेतला. त्यामुळे कोणत्या मोबाईलचा स्फोट झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.
नाजरीन हसन यांचा मृत्यू आगीमुळे झाला नाही, तर स्फोटामुळे मोबाईलचे बारीक तुकडे त्यांच्या डोक्यात आणि शरीराच्या इतर भागात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. स्फोटनंतर हसन यांच्या खोलीला आग लागली मात्र आगीमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही, असं नातेवाईकाचं म्हणणं आहे.
या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते हसन यांच्या मृत्यूचं कारण वेगळं आहे. पोलिसांच्या मते मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर आगीमुळे झालेल्या धुरामुळे श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र हसन यांच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनच्या स्फोटनंतर झालेल्या दुखापतीतं हसन यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.
नाजरीन हसन मलेशियातील क्रॅडल फंड या कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होते.