Amazon : 27 वर्षांनंतर जेफ बेझोस सोडणार सीईओ पद, स्पेस मिशनवर लक्ष केंद्रीत करणार
जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की, आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर (Blue Origin) लक्ष केंद्रीत करण्यासाठी अॅमेझॉनचं सीईओ पद सोडण्याची इच्छा आहे.
Amazon : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस हे आज 27 वर्षांनतर आपल्या पदावरुन पायउतार होत आहेत. आता त्यांची जागा कंपनीच्या क्लाऊड कम्युटिंग चिफ असलेल्या अॅन्डी जेसी यांनी घेतली आहे. अॅन्डी जेसी हे जेफ बेझोस यांचे जवळचे मानले जातात. जेफ बेझोस जरी सीईओ पदावरुन पायउतार झाले असले तरी ते कंपनीचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतील. यापुढे आपण स्पेस मिशनवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं संकेत त्यांनी दिले आहेत.
आपल्या कुशल नेतृत्वामुळे आणि कल्पना शक्तीमुळे जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनला जगातली तिसरी मोठी कंपनी बनवलं आहे. या कंपनीचे भागभांडवल सध्या 1.77 लाख कोटी डॉलर इतके आहे.
स्पेस फ्लाईट मिशनवर लक्ष केंद्रीत करणार
जेफ बेझोस यांची निवड कंपनीचे बोर्ड कार्यकारी अध्यक्ष म्हणून केली असल्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे. बेझोस यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की, त्यांना इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अॅमेझॉनचं सीईओ पद सोडण्याची इच्छा आहे.
जेफ बेझोस आपली कंपनी 'ब्लू ओरिजिन'च्या माध्यमातून पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. हे अंतराळ यान 20 जुलै रोजी उड्डाण भरणार आहे. या यानातून टेक्सासमधून अंतराळात थोड्या वेळासाठी प्रवास केला जाणार आहे. तसेच 20 जुलै रोजी अपोलो-11 चंद्रावर पोहोचण्याचा वर्धापन दिन देखील साजरा केला जातो.
बेझोस यांनी इंस्टाग्रामवर सांगितलं होतं की, "पृथ्वीला अंतराळातून पाहणं, तुम्हाला बदलून टाकतं. या ग्रहासोबतचं नातं तुमच्यासोबत बदलून टाकतो. मला या उड्डाणातून प्रवास करण्याची इच्छा आहे. कारण ही एक अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या आयुष्यात करायची होती. हे फार रोमांचक असणार आहे. हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे."
सन 1994 साली जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनची स्थापना केली होती. सुरुवातीला केवळ एक ऑनलाईन बुकस्टोअर असलेल्या अॅमेझॉनचे रुपांतर आज जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनीमध्ये झाले आहे. आज अॅमेझॉनकडून जगातील सर्व प्रकारच्या वस्तू विकल्या जातात.
जेफ बेझोस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहून अॅन्डी जेसींकडे कंपनीच्या सीईओपदाची धुरा सोपवत असल्याचं सांगत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी आपल्या पत्रात म्हणाले की, "मला अॅमेझॉन कंपनीचा बोर्डचे कार्यकारी अधिकारी आणि अॅन्डी जेसी यांनी सीईओ बनवण्यात आले आहे, याचा मला आनंद होतोय. या नव्या भूमिकेत काम करताना मी नव्या उत्साहाने आणि उमेदीने काम करेन. अॅन्डी जेसीवर माझा पूर्ण भरवसा आहे."
जेफ बेझोस यांनी आपल्या पत्रात पुढं म्हटलंय की, "हा प्रवास जवळपास 27 वर्षापूर्वी सुरु झाला होता. अॅमेझॉन केवळ एक विचार होता, त्यावेळी त्याचे काहीच नाव नव्हतं. त्यावेळी मला विचारण्यात यायचं की इंटरनेट काय आहे? आज आपण 13 लाख प्रतिभावान आणि कामाप्रती निष्ठा बाळगणाऱ्या लोकांना रोजगार देतोय. कोट्यवधी ग्राहकांना आपली सेवा पुरवतोय आणि विस्तृत स्वरुपात जगातील सर्वात यशस्वी कंपनीच्या प्रस्थापित झालोय."
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Assembly Session 2021 : अधिवेशनात विरोधी पक्षाच्या 'उद्योगां'चाही भांडाफोड करा : सामना
- Maharashtra Assembly Session 2021 : आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन; 'हे' मुद्दे वादळी ठरण्याची शक्यता
- MNS : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक, नवी मुंबई ते विधानभवन मनसैनिक चालत जाऊन सरकारचा निषेध करणार