Israel : इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर, गाझा पट्टीवर बॉम्बचा वर्षाव सुरु
Israel Palestine Conflict : पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेल्या हमासने (Hamas group) इस्रायलवर 1500 रॉकेट्स डागली असून त्याला इस्रायलनेही प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर (Gaza Strip) बॉम्बचा वर्षाव सुरु केला असून त्यामध्ये 11 दहशतवादी आणि 70 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Israel Palestine Conflict : पॅलेस्टाईनमधील दहशतवादी गट असलेल्या हमासकडून इस्रायलवर गेल्या तीन दिवसात 1500 पेक्षा जास्त रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाल्याचा दावा इस्रायलने केला असून आता हमासला जशास-तसं उत्तर दिलं आहे. इस्रायलनेही गाझा पट्टीवर प्रतिहल्ला करुन हमासच्या 11 कमांडरना मारल्यांचं वृत्त आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात 70 पॅलेस्टिनी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी जेरुसलेम तीन मोठ्या स्फोटांनी हादरलं होतं. जेरुसलेमच्या वेस्ट वॉलजवळ ज्यू धर्मीय प्रार्थना करत असताना हमासकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामध्ये नऊ मुलांसह 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. जेरुसलेम मधील अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायल पोलीस आँणि पॅले्स्टिनी नागरिकांच्यात झटापट झाली होती. त्यामध्ये शेकडो नागरिकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते.
या घटनेनंतर आता इस्रायल-पॅलेस्टाईन वाद पुन्हा उफाळला असून पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेल्या हमासने 1500 हून जास्त रॉकेट इस्रायलच्या दिशेने सोडली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या हवाई दलाने गाझा पट्टीवर बॉम्बचा वर्षाव सुरु केला. या दोन देशातील तणावावर संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे.
Hamas launched rockets at Tel Aviv and toward Jerusalem early on Thursday and Israel vowed to keep pummeling the Islamist faction in Gaza https://t.co/Ot858O8hkG pic.twitter.com/NPCWCYol4S
— Reuters (@Reuters) May 13, 2021
अमेरिकेचे इस्रायलला समर्थन
या दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे युद्ध लवकरात लवकर संपावं आणि या प्रदेशात शांतता नांदावी अशी इच्छा व्यक्त केली. पण हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यावर इस्रायलला स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
हमासच्या सगळ्या दहशतवाद्यांना संपवूनच शांत बसण्याचा इरादा इस्रायलने व्यक्त केला आहे. अमेरिकेने इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे तर मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांदरम्यान 2014 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :