Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार
100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धाला आज रविवारी (14 जानेवारी) 100 दिवस पूर्ण झाले. परंतु सध्या सुरु असलेलं युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. युद्धबंदीऐवजी इस्रायलने गाझावरील हल्ल्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे. 7 ऑक्टोबर 2023 पासून युद्ध सुरू आहे.
24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर
शनिवारी (13 जानेवारी) झालेल्या हल्ल्यात 135 लोकांचा मृत्यू झाला होता तर 312 लोक जखमी झाले होते. 100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. सुमारे 10 हजार लोक बेपत्ता आहेत. बॉम्बस्फोटादरम्यान उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ते गाडले गेल्याची भीती आहे. गाझाची लोकसंख्या 23 लाख असून त्यापैकी 19 लाख लोक बेघर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गाझामध्ये विजय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार
सध्या तरी इस्रायल-गाझा युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अलीकडेच म्हटले होते की, 'आम्ही हमासला नष्ट करू. गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध विजय मिळेपर्यंत युद्ध सुरूच राहील. इस्रायलला विजय मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. इजिप्त आणि गाझा दरम्यानची 14 किमी लांबीची सीमा कायमची बंद करावी, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले आहे. हमासचे सर्व सैनिक येथून आत जातात आणि बाहेर पडतात. ही पट्टी दुसऱ्या देशाच्या सीमेला जोडलेली असल्याने इस्त्रायलला येथे थेट हल्ला करणे अवघड आहे.
गाझाची ऐतिहासिक स्थळे नष्ट
इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात जवळपास संपूर्ण गाझा उद्ध्वस्त झाला आहे. माणसांबरोबरच तिथली ऐतिहासिक स्थळेही नष्ट झाली. हेरिटेज फॉर पीस ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, गाझामधील आतापर्यंत 325 ऐतिहासिक स्थळे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे सांस्कृतिक मंत्री अतेफ अबू सैफ म्हणतात की गाझामध्ये सतत बॉम्बफेक सुरूच आहे. शेकडो आणि हजारो वर्ष जुन्या ऐतिहासिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
पैगंबर मोहम्मदच्या आजोबांची कबर देखील नष्ट
यापैकी सेंट पॉर्फिरियस चर्च हे जगातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. हे 1800 वर्षे जुने आहे. सय्यद हाशेम मशीद, जिथे पैगंबर मोहम्मदच्या आजोबांची कबर आहे, ती देखील नष्ट झाली. शहरातील प्रत्येक बाजारपेठ, नाट्यगृह, संग्रहालय, ग्रंथालय आणि सर्व पवित्र स्थळे नष्ट झाली आहेत. सोशल मीडियावर हजारो लोक आपली व्यथा मांडत आहेत. लोकांची घरे उध्वस्त होण्यापेक्षा ओमारी मशिदीच्या विध्वंसाचे जास्त दुःख होते. कारण ते जुन्या गाझाचे प्रतीक होते.गाझाची संस्कृती अशाप्रकारे नष्ट करणे म्हणजे केवळ मानवी नरसंहार नव्हे तर सांस्कृतिक नरसंहार असल्याचा आरोप इस्रायलवर होत आहे. इस्त्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, ही ठिकाणे हमासच्या बोगद्याशी जोडलेली आहेत आणि येथे लढाऊ लपून बसण्याची शक्यता आहे.
इस्रायल-पॅलेस्टिनी वाद हा जगातील सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. हे युद्ध थांबवण्यातही जग अयशस्वी ठरले आहे. इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या या युद्धावर जगभरातील देशांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. काही देश इस्रायलला पाठिंबा देत आहेत तर काही गाझा आणि पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. काही देशांमध्ये इस्रायलच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनेही होत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या