Israel : इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला, 5 ठार; मागील काही दिवसातील तिसरा हल्ला
Israel Terror Attack : इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जण ठार झाले. मागील काही दिवसातील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे.
Israel Terror Attack : इस्रायलमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीवजवळ झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान ५ जण ठार झाले आहेत. गेल्या आठवडाभरातील ही तिसरी दहशतवादी घटना आहे. तेल अवीव शहराजवळ पॅलेस्टिनी बंदुकधारी व्यक्तीने पाच जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला कट्टरतावादी ज्यू धर्मियांची संख्या अधिक असलेल्या भागात झाला.
घटनास्थळी असलेल्या एका सहाय्यक डॉक्टरांने सांगितले की, सशस्त्र हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. मागील आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलमधील सुरक्षा दलाला हाय अलर्टचा इशारा देण्यात आला होता.
दहशतवादी हल्ल्यात ५ ठार
हल्लेखोराने M16 असॉल्ट रायफलने रस्त्यावर गोळीबार केला. गेल्या आठवडाभरात अशा 3 दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. इस्रायलला घातक अरब दहशतवादाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. इस्रायल सरकार दहशतवादाचा मुकाबला अधिक कठोरपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी दोन पुरुषांची गोळ्या झाडून हत्या केली. हे दोन्ही जण एका किराणा दुकानाबाहेर बसले होते. हल्लेखोरांजवळून जात असलेल्या एका कारवरही त्यांनी गोळीबार केला.
दीया हमरशेह असे या 27 वर्षीय पॅलेस्टिनी हल्लेखोराचे नाव आहे. तो पॅलेस्टाइनमधील याबाद येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा नियमांच्या गुन्ह्याप्रकरणी त्याला इस्रायली सुरक्षा रक्षकांनी अटकही केली होती. या हल्ल्यानंतर वेस्ट बँकमधील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील तिघेजण हे हमरशेह याच्या कुटुंबीयांशी संबंधित आहेत. या पाच जणांचा हल्ल्याशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : रशियाचा मारियुपोलमध्ये युद्धविराम जाहीर, 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती0
- Russia Offer to India : रशियाने भारताला दिली खास ऑफर, अमेरिकन निर्बंधही होतील निष्प्रभ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha