International Day of Happiness : आज जागतिक आनंदी दिन... का साजरा केला जातो हा दिवस...
International Day of Happiness 2022 : प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी जागतिक आनंदी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे आनंदी जीवन आणि आरोग्यसंपन्न राहण्याची प्रेरणा मिळावी.
International Day of Happiness 2022 Date : आनंदी राहायला कुणाला आवडत नाही. पण प्रत्येक माणूस आनंदी राहतोच असं नाही. कुणाला आर्थिक त्रास असतो, टेन्शन असतं तर कुणाला कौटुंबिक तणाव असतो तर कुणी आजारांनी त्रस्त असतो. या धावपळीच्या जगात प्रत्येकजण आनंद शोधायची धडपड करत असतो. गडगंज संपत्ती असणारा माणूस देखील अनेकदा खूश नसतो तर कमी पैसा कमवणारा व्यक्तीही आनंदी राहू शकतो, अशी अनेक उदाहरणं आपल्या अवती भवती असतील.
आनंदी राहता यावं यासाठी अनेकदा लोकं वेगवेगळे उपाय करतात. मात्र त्यानं ते आनंदी होतीलच असं नाही. मानसिक दृष्टीनं आनंदी राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लोकांना आरोग्याप्रति जागरुक करण्यासाठी प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रानं इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेस साजरा करण्याची घोषणा केली आहे. 2013 सालापासून हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. 2013 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आनंदी दिन भूटानची राजधानी थिम्पूमध्ये साजरा केला गेला. त्यानंतर हळूहळू हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला. भूटान सरकारनं तर या दिवशी सरकारी सुट्टी देखील जाहीर केली आहे. जेणेकरुन लोकांनी आपल्या घरच्यांच्या सोबत हा दिवस साजरा करावा.
वेगवेगळ्या कारणांनी तणावामध्ये वाढ...
कोरोना महामारी असो किंवा व्यक्तिगत आयुष्यातील ताणतणाव असो, कित्येक नागरिक यामुळं त्रासलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद हरवला आहे. सोबतच इंटरनेटचा प्रभाव असल्या कारणानं लोकं आभासी दुनियेत अधिक व्यस्त आहेत. यामुळं प्रत्यक्ष नाती जपण्यामध्ये बऱ्याचदा माणूस कमी पडताना दिसत आहे. यामुळं वाद-विवाद, कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढीस लागलं आहे. नोकरीच्या ठिकाणी असलेला ताण अशा गोष्टी देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळं आनंददायी जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. हाच दृष्टिकोन समोर ठेवत जागतिक आनंददायी दिवस साजरा केला जातो.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha