(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indo-US Military Exercise : ऑक्टोबरमध्ये होणार भारत-अमेरिका युद्धसराव, चीनचा आक्षेप भारतानं फेटाळला
Indo-US Military Exercise : उत्तराखंडमध्ये होणाऱ्या भारत-अमेरिका लष्करी सरावावर चीनने आक्षेप घेतला होता. भारताने हा आक्षेप फेटाळला आहे.
Indo-US Military Exercise : ऑक्टोबर महिन्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध सराव (Military Exercise) होणार आहे. या सरावावर चीननं आक्षेप नोंदवला होता. मात्र, भारतानं हा आक्षेप फेटाळून लावला आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) ऑक्टोबर महिन्यामध्ये भारत-अमेरिका युद्धाभ्यास होणार आहे. यावर चीन सुरक्षा मंत्रालयाने युद्ध सरावावर आक्षेप घेत म्हटलं होतं की, सीमाप्रश्नावर तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला चीनचा ठाम विरोध आहे. यावर भारताची प्रतिक्रिया देत चीनला आक्षेप फेटाळून लावला आहे. भारत आणि चीनचा सीमाप्रश्न सर्वज्ञात आहे. त्यामुळे चीनने भारत-अमेरिका युद्धसरावावर आक्षेप घेतला.
14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान भारत-अमेरिका युद्धाभ्यास
भारत आणि अमेरिका यांच्यात उत्तराखंड येथे युद्धाभ्यास होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धसरावाला 'युद्धाभ्यास' असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडमधील औली येथे 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान भारत-अमेरिका 'युद्धाभ्यास' होणार आहे. यावर चीनचा आक्षेप फेटाळत परराष्ट्रमंत्रालयाने प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे की, 'यामध्ये तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाचा चीनचा संदर्भ समजत नाहीय. भारत-अमेरिका यांच्यातील युद्धसराव ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. यामध्ये कोणत्याही कराराचं उल्लंघन आहे, असं मला वाटत नाही.'
चीन द्विपक्षीय करारांचे पालन करणार
भारत - अमेरिका यांच्यातील लष्करी सरावावर चिनी राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केलेल्या टिकेबद्दल बागची यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल टॅन केफेई यांनी आशा व्यक्त केली की भारत वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) लष्करी सराव न करण्याच्या द्विपक्षीय करारांचे पालन करेल.
दरम्यान चीनने कराराचं उल्लंघन करतपूर्व लडाखमध्ये चीनच्या वाढत्या हालचालींचा उल्लेख करत चीनवर निशाणा साधला. बागची यांनी म्हटलं की, 'दोन्ही देशांनी भूतकाळात झालेल्या करारांवर ठाम राहिलं पाहिजे मात्र स्पष्टपणे तसं झालेलं नाही.' चीनने करारांचं उल्लंघन करून पूर्व लडाखमधील हालचाली वाढवल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर द्विपक्षीय संबंध आणि शांतता आवश्यक आहे.
चीनकडून LACवर हालचाली सुरुच
चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरूच आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी चीनकडून गावं वसवली जात आहेत. आता चीन भारताजवळ (India China Tension) असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ महामार्ग बांधणार आहे. चीन बांधत असलेला महामार्ग हा भारताच्या सीमारेषा भाग मार्गे जिंगजँग आणि तिबेटला जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे चीनची सामरिक स्थिती आणखी मजबूत होणार आहे. लष्कराच्या हालचालीसाठी हा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे.