सात महिन्यांपासून धुमसणारं गाझा मोकळा श्वास घेणार? हमासकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य, इस्त्रायलच्या भूमिकेकडे लक्ष
Israel-Hamas Ceasefire: हमासने सोमवारी इजिप्त-कतारनं दिलेला शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला आहे. मात्र, इस्त्रायलकडून याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.
Israel-Hamas Ceasefire: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील युद्धाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. तब्बल सात महिन्यांपासून सुरू असलेल्या गाझामधील युद्धाला (Gaza War) अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. हमासने सोमवारी इजिप्त-कतारनं (Egypt-Qatar) दिलेला शस्त्रसंधी (Ceasefire) प्रस्ताव स्वीकारला आहे. मात्र, इस्त्रायलकडून याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही. त्यामुळे आता इस्त्रायलच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांनी सूचित केलं की, इजिप्त-कतारच्या मध्यस्थीतील युद्धविराम प्रस्तावात 'दूरगामी' निष्कर्ष आहेत, जे तेल अवीव स्वीकारण्यास तयार नव्हते. "वॉर कॅबिनेटनं एकमतानं राफामधील ऑपरेशन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे," असं इस्रायली पंतप्रधान कार्यालयानं नंतर एका निवेदनात म्हटलं आहे. युद्धविराम करारावर वाटाघाटी करण्यासाठी आम्ही आमचे मध्यस्थ पाठवू, कारण हमासचा प्रस्ताव इस्रायलच्या आवश्यकता पूर्ण करत नाही, असंही इस्रायली पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.
इजिप्त आणि कतारचा शस्त्रसंधी प्रस्ताव हमासकडून मान्य
इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीनं मांडलेला शस्त्रसंधी प्रस्ताव हमासनं मान्य केला आहे. या युद्धबंदी प्रस्तावानुसार, गाझामध्ये इस्त्रायलसोबत सात महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपुष्टात येईल. सोमवारी हमासनं या प्रस्तावाबाबत एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, त्याचे राजकीय ब्युरो प्रमुख इस्माइल हनीयेह यांनी कतारचे पंतप्रधान आणि इजिप्तच्या गुप्तचर खात्याच्या मंत्री यांना हमासने युद्धविराम प्रस्ताव स्वीकारल्याचं सांगितलं आहे.
अल जजीराच्या वृत्तानुसार, हमासचे राजकीय ब्युरो चीफ इस्माइल हनीयेह यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी आणि इजिप्तचे गुप्तचर मंत्री अब्बास कामेल यांना फोन केला आणि युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितलं. मात्र, या प्रस्तावावर इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एकीकडे इस्त्रायलची चेतावणी, दुसरीकडे हमासकडून शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी
इस्रायलनं लष्करी कारवाईच्या धोक्यापासून वाचण्यासाठी गाझामधील राफा शहर रिकामं करण्याचा इशारा हजारो लोकांना दिला होता. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर लोकांनी गाझामधील दक्षिण शहर राफा सोडण्यास सुरुवात केली. दरम्यान, हमासनं युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला. हमासच्या या निर्णयानंतर राफामध्ये लोक आनंदोत्सव साजरा करत असल्याचं वृत्त समोर येत आहे.
इस्रायल आणि हमास दीर्घकाळापासून कतार आणि इजिप्तच्या माध्यमातून गाझामध्ये युद्धविरामासाठी अप्रत्यक्षपणे वाटाघाटी करत आहेत, जेणेकरून युद्धविराम लागू होईल आणि एकमेकांच्या कैद्यांची देवाणघेवाण करता येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इजिप्त आणि हमासचे अधिकारी दावा करत आहेत की, युद्धविराम टप्प्याटप्प्यानं होईल, ज्या अंतर्गत हमास आणि इस्रायल हळूहळू कैद्यांची सुटका करतील आणि गाझा भागातून माघार घेतील. सध्याच्या युद्धविराम अंतर्गत काय केलं जाणार आहे याची तपशीलवार माहिती अद्याप समोर आलेली नाही.