Gun Firing In USA: अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; एकाच दिवसांत दोन घटना, नऊ जण ठार
Gun Violance In USA: अमेरिकेतील (America) बंदूक संस्कृती आता मोठी समस्या ठरतेय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत सातत्यानं गोळीबाराच्या घटाना समोर येत आहेत.

Gun Violance In USA: जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेसाठी (America) आता तेथील बंदूक संस्कृती (Gun Culture) डोकेदुखी ठरतेय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अमेरिकेतून गोळीबाराच्या (Firing in America) घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये (California) सोमवारी (23 जानेवारी) झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, पोलिसांनी या घटनेतील संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 30 मैल अंतरावर हाफ मून बेजवळ एका महामार्गावर गोळीबाराची घटना घडली होती.
सॅन मेंटो पोलिसांनी सांगितलं की, अमेरिकेत गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. तसेच, अमेरिकेतील आयोवा येथील डेस मोयनेस शहरातील एका शाळेत सोमवारी झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार झाले आहेत, तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. डेस मोयनेस पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिक्षकाची प्रकृतीही चिंताजनक आहे.
काय म्हणाले स्थानिक नेते?
कॅलिफोर्नियाच्या स्थानिक नेत्यांनी ट्वीट केलंय की, आमच्या स्थानिक जिल्ह्यात गोळीबारामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल अतिव दुःख झालं, यासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाला शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करू.
कॅलिफोर्नियामध्ये रविवारीही गोळीबार
कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 22 जानेवारी रोजी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर बचावकार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कॅलिफोर्नियातील गोळीबारात मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचा ध्वज एका दिवसासाठी खाली ठेवण्याचे आदेश दिले.
आशियाई बहुल भागात गोळीबार
सीएनएन वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गोळीबार झालेल्या मॉन्टेरी पार्कमध्ये आशियाई वंशाचे लोक मोठ्या संख्येनं राहतात. एकूण लोकसंख्येपैकी 65.5 टक्के लोक तिथे राहतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते गोळीबारामागील एक कारण वांशिक भेदभाव असू शकतो. एफबीआय या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळतेय. FBI लॉस एंजेलिस फील्ड ऑफिस स्थानिक पोलिसांशी संवाद साधत आहे आणि इतर सर्व संबंधित एजन्सींसोबत काम करत आहे.
अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच
अमेरिकेतील सामूहिक गोळीबाराचा सिलसिला थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या शहरातून दररोज सामूहिक गोळीबाराचं वृत्त समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि गोळीबार हे समीकरण झालं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच, 2022 मध्ये अमेरिकत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटना हॉस्पिटल, पब, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. अमेरिकेसाठी तेथील बंदूक संस्कृती ही दिवसागणिक मोठी समस्या होत चालली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शस्त्रास्त्रांबाबत कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: व्यक्त केलं आहे.
अमेरिकेतील बंदूक संस्कृती मोठी समस्या
अमेरिकेसाठी बंदूक संस्कृती ही मोठी समस्या बनली आहे. 2021 मध्ये जवळपास 49 हजार लोकांनी गोळीबारात आपला जीव गमावला. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. देशात लोकसंख्येपेक्षा जास्त शस्त्रं आहेत. तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीकडे किमान एक बंदूक असते आणि दोनपैकी जवळपास एक प्रौढ व्यक्ती बंदूक असलेल्या घरात राहतो.


















