कुवेतमध्ये 6 मजली इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये सर्वाधिक भारतीय; 50 पेक्षा जास्त जखमी
कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगाफ भागातील 6 मजले उंच इमारतीत ही आग लागली होती. या इमारतीमधील स्वयंपाक घरातून आगीने पेट घेतला.
नवी दिल्ली : कुवेतच्या मंगाफ येथे आज सकाळी एका उंच इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत 43 जणांचा मृ्त्यू झाला असून 30 जण जखमी असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये 41 भारतीय नागरिक असल्याचे समजते. कुवेतमधील (Kuwait) भारतीय दुतावासाने याबाबत माहिती देताना म्हटले की, या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त कामगार (Labour) जखमी झाले आहेत. येथील मंगाफ शहरात सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत कामगारांच्या निवासासाठी वापरण्यात येत होती, जेथे मोठ्या संख्येने कामगार राहत होते.
कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगाफ भागातील 6 मजले उंच इमारतीत ही आग लागली होती. या इमारतीमधील स्वयंपाक घरातून आगीने पेट घेतला, त्यानंतर ही आग सर्वत्र भडकली. या इमारतीमध्ये 160 जण राहत होते. हे सर्वजण एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या निवासाची सोय या इमारतीमध्ये करण्यात आली होती. दुर्दैवाने आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 41 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी आहेत.
भारतीय दुतावासानेही ट्विट करुन दिली माहिती
कुवेतमधील भारतीय दुतावासानेही ट्विटरवरुन पोस्ट लिहिली आहे. भारतीय कामगारांशी संबंधित आगीच्या दु:खद घटनेनंतर तत्काळ मदतसेवेसाठी हेल्पलाईन नंबर 96565505246 जारी करण्यात आला आहे. सर्वच भारतीयांनी अपडेट माहितीसाठी या नंबरशी संपर्कात राहावे, सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आवाहनही दुतावासाकडून करण्यात आले आहे.
In connection with the tragic fire-accident involving Indian workers today, Embassy has put in place an emergency helpline number: +965-65505246.
— India in Kuwait (@indembkwt) June 12, 2024
All concerned are requested to connect over this helpline for updates. Embassy remains committed to render all possible assistance. https://t.co/RiXrv2oceo
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून शोक
कुवेत शहरात लागलेल्या या आगीच्या घटनेवर पराराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही ट्विट करुन शोक व्यक्त केला. आग लागलेल्या घटनेनं दु:ख झालं आहे, या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त नागरिकांचा मृ्त्यू झाला असून 50 पेक्षा जास्त जखमी असल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय आपले राजदूत रुग्णालयात पोहोचले आहेत. पीडित कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत, तर जखमींना लवकरात लवकर बरं करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही जयशंकर यांनी म्हटले. दरम्यान, दुतावास विभागाकडून दुर्घटनेतील नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जयशंकर यांनी ट्विट करुन म्हटले आहे.