Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
Alinagar Election Result Updates: अलीनगर विधानसभेतील भाजप उमेदवार मैथिली ठाकूर विरुद्ध आरजेडी उमेदवार विनोद मिश्रा यांच्यात चुरशीने लढत झाली. त्यामध्ये मैथिली ठाकूरने बाजी मारली.

Alinagar Election Result LIVE Result Updates: बिहारच्या (Bihar Election 2025) सत्तेच्या चाव्या आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाील एनडीएकडे असणार हे स्पष्ट झालं आहे. कलांमध्ये भाजपनं (BJP) बहुमताचा आकडा गाठला आहे. अशातच बिहार निवडणुकीत (Bihar Election Result Breaking) सर्वात हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेली लढत म्हणजे, अलीनगर विधानसभेतील भाजप उमेदवार मैथिली ठाकूर हिने जिंकली आहे. मैथिली ठाकूर हिने आरजेडी उमेदवार विनोद मिश्रा यांचा 11 हजार मतांनी पराभव केला आहे. मैथिली ठाकूर हिला 84,915 मतं मिळाली, तर विरोधी उमेदवार विनोद मिश्रा यांना 73,115 मतं मिळाली आहेत.
भाजपनं अलीनगर मतदारसंघातून (Alinagar Constituency Bihar Election Result) लोकगायिका मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांना उमेदवारी दिली. लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर फक्त पंचवीस वर्षांची आहे आणि ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तर मैथिलीच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात असलेले विनोद मिश्रा अलीनगरमधील स्थानिक आहेत. म्हणूनच संपूर्ण निवडणूक प्रचारावेळी मैथिलीला मतदारसंघाच्या बाहेरची व्यक्ती म्हणून संबोधलं गेलेलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीनगरमधील एका गावात सभा घेतलेली, यावरूनच भाजपसाठी अलीनगरची जागा किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होतंय. उत्तर प्रदेशातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रचार केला आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः मतदारसंघाची जबाबदारी घेतलेली. तसेच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अलीनगरमध्ये रोड शो केला.
| उमेदवार | पक्ष | आघाडीवर/पिछाडीवर |
| मैथिली ठाकूर | BJP | आघाडीवर |
| विनोद मिश्रा | RJD | पिछाडीवर |
अलीनगर विधानसभा मतदारसंघाबाबत थोडसं...
दरभंगापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलीनगर विधानसभा मतदारसंघाचा पूर्वेकडील भाग हा पूरप्रवण क्षेत्र आहे, जो कमला आणि कोशी नद्यांच्या सीमेवर आहे. ही सामान्य श्रेणीची जागा दरभंगा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, ज्यामध्ये अलीनगर, तद्दीह आणि घनश्यामपूर समाविष्ट आहेत.
2008 मध्ये सीमांकन आयोगाच्या शिफारशीवरून निर्माण झालेल्या या जागेची पहिली निवडणूक 2010 मध्ये झाली. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) चे मिश्री लाल यादव यांनी आरजेडीचे विनोद मिश्रा यांचा 3,101 मतांनी पराभव केला. 2015 मध्ये आरजेडीचे अब्दुल बारी सिद्दीकी यांनी भाजपचे मिश्री लाल यादव यांचा 13,460 मतांनी पराभव केला. ब्राह्मण आणि मुस्लिम बहुल असलेल्या या जागेवर एकूण 284,519 मतदार आहेत, ज्यात 148,976 पुरुष आणि 135,519 महिलांचा समावेश आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान मैथिली ठाकूर झालेली ट्रोल
मैथिली ठाकूर हिला अलीनगरमधून भाजपनं उमेदवारी दिली आणि तेव्हापासूनच अलीनगरची विधानसभा निवडणूक सर्वांसाठी चर्चेचा विषय झाली. निवडणूक प्रचारावेळी मैथिली अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली. 'पाग विवाद', 'ब्ल्यू प्रिंट विवाद' यामुळे अनेक वाद निर्माण झालेले.
मैथिलीच्या प्रचारादरम्यान, उत्तर प्रदेशच्या आमदार केतकी सिंह, यांनी मिथिला समाजाचं प्रतीक असलेली पगडी धरलेली आणि विचारलेलं की, "हे काय आहे?" त्यावेळी तिथे जमलेल्या गर्दीनं उत्तर दिलेलं की, "हा मिथिलाचा सन्मान आहे..." तर, उत्तर प्रदेशच्या आमदार केतकी सिंह यांनी मैथिली ठाकूरकडे बोट दाखवून म्हणालेल्या की, "नाही, हा मिथिलाचा सन्मान नाही; हा मिथिलाचा सन्मान आहे...", केतकी सिंह यांच्या या उत्तरामुळेच वाद वाढला होता. त्यात भरीस भर म्हणून मैथिलीनं पाग (डोक्यावर घालण्यात येणारी पगडी) मध्ये मखाने घेऊन खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला. ज्यामध्ये दावा करण्यात आलेला की, हा व्हिडीओ घनश्यामपूरमधील तिच्या प्रचारातील आहे. प्रकरण वाढताच, केतकी सिंह आणि भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी माफी मागितली. मैथिलीनं स्पष्ट केलं की, "माझ्या पगडीत जाणूनबुजून मखाना ठेवून मला फसवण्यात आलं..."




















