US-Pak : भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
Pak Army Chief Asim Munir: पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर जून महिन्यात अमेरिकेला गेले होते. त्यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये जेवण केलं होतं.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे.याचवेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर पुन्हा एकदा अमेरिकेत दाखल झाल्याची बातमी आहे. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) चे कमांडर जनरल मायकल कुरीला च्या फेअरवेलमध्ये सहभागी होण्यासाी मुनीर फ्लोरिडाला पोहोचल्याची माहिती आहे.
पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी निशान-ए-इम्तियाज पदकानं जनरल कुरीला यांचा सन्मान केला होता. जनरल कुरीला यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला दणका बसल्यानंतर देखील पाकचं कौतुक केलं होतं. जनरल कुरीला यांना पाकिस्तान हा दहशतवाद पीडित देश असल्याचं म्हटलं होतं.
अमेरिका-पाकिस्तानकडून अधिकृत माहिती नाही
मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्ष सेंट्रल कमांडची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जनरल कुरीला यांचा कार्यकाळ संपला आहे. सेंटकॉमच्या फ्लोरिडा येथील तम्पा बेसवर कुरीला यांचा फेअरवेलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी मुनीर फ्लोरिडा येथे पोहोचल्याची माहिती आहे. अमेरिका किंवा पाकिस्ताननं या दौऱ्यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, ओपन सोर्स इंटेलिजन्समध्ये पाकिस्तानी वायूसेनेचं एक विमान तम्पा बेसवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या सेंटकॉमची जबाबदारी ही पाकिस्तान, अफगाणिस्तान ते मध्य पूर्वेपर्यंत आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्यामध्ये जनरल कुरीला यांची महत्त्वाची भूमिका आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला पकडून कुरीला यांच्याकडे सोपवलं होतं.
मुनीर -ट्रम्प यांच्या बैठकीनंतर भारत-अमेरिका संबंधात तणाव
ऑपरेशन सिंदूरनंतर मुनीर यांचा हा अमेरिकेचा दुसरा दौरा आहे. यापूर्वी जून महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना लंचला आमंत्रित केलं होतं. त्या दौऱ्याचा कोणताही फोटो सार्वजनिक करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढले आहेत.
ट्रम्प यांच्याकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आलं आहे. याशिवाय भारतावर प्रतिबंध लावण्याची धमकी देखील त्यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. याशिवाय आणखी एक कारण आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, भारतानं ते पूर्णपणे नाकारलं होतं.
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार द्या, पाकिस्तानची मागणी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवण्याबाबत ट्रम्प करत असलेले दावे पाकिस्ताननं मान्य केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचं नोबेल पुरस्कार द्यावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे. यामुळं ट्रम्प यांनी मुनीर यांचं जोरदार स्वागत केलं आहे. जनरल कुरीला यांच्या जागी यूएस नौदाचे व्हाईस एडमिरल चार्लस ब्रॅडफॉर्ड यांना सेंटकॉमजी जबाबादारी दिली जाणार आहे.

























