Donald Trump Court Hearing: "मी दोषी नाही, निर्दोष"; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सर्व आरोप फेटाळले, प्रकरण नेमकं काय?
Donald Trump Hearing: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी (3 ऑगस्ट) न्यायालयात हजर झाले. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.
Donald Trump Court Hearing: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा 2020 च्या निवडणुकीतील पराभव रोखण्यासाठी कट रचल्याप्रकरणी वॉशिंग्टन डीसी न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत दोषी नसल्याचं सांगितलं. सुनावणीदरम्यान ट्रम्प यांनी अत्यंत खालच्या आवाजात न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचं सांगितलं आणि त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. कारवाईसाठी त्यांनी आपलं नाव आणि वयही सांगितलं. मी कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेतले नसल्याचंही यावेळी ट्रम्प यांनी न्यायालयाला सांगितलं.
गेल्या चार महिन्यांतील ही तिसरी वेळ आहे की, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना गुन्हेगार म्हणून न्यायालयात हजर व्हावं लागलं आहे. ट्रम्प यांना न्यायालयाच्या मागील दारानं आत आणण्यात आलं. ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त, सुमारे 1000 इतर गुन्हेगारांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांच्यावर 6 जानेवारी रोजी यूएस कॅपिटलमध्ये प्रवेश करून तिथे दंगल केल्याचा आरोप होता. 2021 मध्ये निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांच्या भडकावून भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केला. अमेरिकन काँग्रेसमध्येही तोडफोड करण्यात आली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोणते आरोप?
सुनावणीदरम्यान ट्रम्प यांची देहबोली एकदम शांत दिसत होती. सहसा आक्रमक पवित्रा घेणारे ट्रम्प कोर्टात मात्र अगदी शांत डोकं टेकवून बसले होते. कोर्टात क्लर्कनं ज्यावेळी ट्रम्प यांचा केस नंबर वाचला, तेव्हा त्यांनी सहमतीनं आपलं डोकं हलवून सहमती दर्शवली. माजी राष्ट्रपतींनी चार आरोपांमध्ये स्वत:ला निर्दोष घोषित केलं आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचं षड्यंत्र', 'सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचं षड्यंत्र', 'सरकारी कामकाजात अडथळा आणणं' आणि 'लोकांच्या हक्कांविरुद्ध कट' असे आरोप लावण्यात आले आहेत.
6 जानेवारीला काय घडलं?
दरम्यान, 6 जानेवारी 2021 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. या दिवशी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेवर म्हणजेच, यूएस कॅपिटलवर हल्ला केला होता. 2020 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या जो बायडन यांना यूएस काँग्रेस निवडणुकीच्या निकालासाठी प्रमाणित करत होती, जेणेकरून अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. हेच थांबवण्यासाठी ट्रम्प समर्थकांनी संसदेवर हल्ला केला. ट्रम्प यांच्यावर असा आरोप होता की, त्यांना त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून निवडणुकीतील पराभव रोखायचा होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :