(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus World Update | जगभरात कोरोनाने घेतले 1.70 लाखांहून अधिक बळी; जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती?
जगभरात कोरोनाचे जवळपास 24 लाख 81 हजार रुग्ण असून बळींची संख्या 1 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी सहा लाख 47 हजार रुग्ण बरे झाले आहेत. अजून सोळा लाख 64 हजार लोक कोरोनाग्रस्त आहेत.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 2,481,026 वर पोहोचली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या आजारामुळे 170,423 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 792,759, स्पेनमध्ये 200,210, इटलीमध्ये 181,228, फ्रान्समध्ये 155,383 कोरोना बाधित आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 42,514, स्पेनमध्ये 20,852, इटलीमध्ये 24,114, फ्रान्समध्ये 20,265 आणि चीनमध्ये 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे.
20 हजरांहून अधिक मृत्यूचा आकडा असणारा चौथा देश फ्रान्स
अमेरिका, इटली आणि स्पेननंतर फ्रान्स चौथा असा देश बनला आहे. जिथे 20 हजारांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. फ्रान्सचे आरोग्य अधिकारी जेरोम सालोमोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोविड-19मुळे 20,265 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये मागील 24 तासांमध्ये 547 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 444 लोक हॉस्पिटल्स आणि 103 लोकांचा नर्सिंग होम्समध्ये मृत्यू झाला आहे. अशातच मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे रूग्ण वेगाने वाढत आहेत. दरम्यान, सालोमोन यांनी सांगितले की, आता कोरोनाच्या प्रादूर्भावामध्ये कमतरता दिसून येत आहे. कारण 5683 रूग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच सोमवारी हा आकडा 8 एप्रिलच्या तुलनेत खाली आला.
अमेरिकेमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 42,000 पार
अमेरिकेमध्ये या महामारीमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 42,000 पार पोहोचली आहे. अमेरिकेमध्ये 42,514 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 792,759 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कमीत कमी 72,389 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
अमेरिकेने गेल्या 24 तासात 1939 लोक गमावले असून एकूण बळींचा आकडा 42 हजार 514वर पोहोचला आहे. तर रुग्णांची संख्या सात लाख 93 हजारांवर पोहोचली आहे. न्यूयॉर्क प्रांतात काल 631 बळी गेले असून तिथे रुग्णांची संख्या 2 लाख 52 हजारांवर तर एकूण मृतांचा आकडा 18,929वर पोहोचला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 4377, मिशिगन मध्ये 2468, मासाचुसेट्स 1809, लुझियाना 1328, इलिनॉईस 1349, कॅलिफोर्निया 1223, पेनसिल्वानिया 1348, कनेक्टिकट 1331 आणि वॉशिंग्टनमध्ये 652 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.
कोरोनाचा प्रभाव जगभरातील देशांवर झाला आहे. जर्मनीत काल 220 बळी गेले, एकूण बळींची संख्या 4862 झाली आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 91 ची भर पडली असून एकूण 5209 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 83505 वर पोहोचली आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल 145 जण मृत्यूमुखी पडले असून एकूण बळींचा आकडा 5548 वर पोहोचला आहे. हॉलंडमध्ये काल 67 बळी घेतले तिथे एकूण 3751 लोक दगावले आहेत. टर्की 2140, ब्राझील 2587, स्वित्झर्लंडने 1429, स्वीडनमध्ये 1580, पोर्तुगाल 735, कॅनडात 1690, इंडोनेशिया 590, तर इस्रायलमध्ये 177 बळी गेले आहेत. दक्षिण कोरियात काल 2 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 236 वर पोहोचला आहे. आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानात रुग्णांची संख्या 8892 वर पोहोचली आहे, तर तिथे 176 लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 73928 तर बळींच्या आकड्यात 5366 ची भर पडली आहे.