ओमायक्रॉनला गांभीर्यानं घ्या! आठवडाभरात जगात दीड कोटी रुग्ण, तर 48 हजार मृत्यू, WHO ची आकडेवारी
Coronavirus World Update : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं जगाची धाकधुक वाढवली आहे. अशातच WHO नं शेअर केलेली कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी धक्कादायक आहे.
Covid-19 in World : संपूर्ण जग सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या सावटाखाली आहे. ओमायक्रॉननं जगभरात आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात नवीन कोरोना विषाणू संसर्गाच्या संख्येत सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिक अहवालात संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेनं सांगितले की, गेल्या आठवड्यात कोविड-19 संसर्गाची सुमारे 15 दशलक्ष नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर 43,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, अहवालानुसार मृतांची संख्या स्थिर आहे. त्याचवेळी, आफ्रिका वगळता जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. तर आफ्रिकेत कोविडच्या प्रकरणांमध्ये सुमारे 11 टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या आठवड्यात जगात संक्रमणाची 15 दशलक्ष नवीन प्रकरणं
डब्ल्यूएचओचे महासंचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात, कोरोना संसर्गाची सुमारे 1.5 कोटी प्रकरणं नोंदवली गेली आहेत, जी एका आठवड्यातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रकरणं आहेत. यापैकी बहुतांश लोकांना ओमायक्रॉनची (Omicron Variant) लागण झाली आहे. ओमायक्रॉन जगभरात सध्या डेल्टाची जागा घेताना दिसत आहे. तसेच ज्यांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यांना ओमायक्रॉनमुळं पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी लसीकरण पूर्ण केलं आहे, त्यांना कोरोनाच्या नवीन प्रकार, ओमिक्रॉनचा संसर्ग देखील होत आहे.
वेगानं फोफावतोय ओमायक्रॉन
समोर आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतंय की, जगभरात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव किती वेगानं वाढत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी 6 लाख 78 हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 1 जानेवारी 2022 रोजी 17 लाख 72 हजार दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, 12 जानेवारी 2022 रोजी हा आकडा वाढून जवळपास 28 लाख 46 पर्यंत पोहोचला. म्हणजेच, फक्त 12 दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येत 9 लाखांची वाढ झाली आहे. केवळ एवढंच नाही, गेल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या 22 एप्रिल 2021 रोजी सुमारे 9 लाख एवढी होती. तर 12 जानेवारी 2022 रोजी कोरोनाबाधितांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे. म्हणजेच, गेल्या लाटेच्या तुलनेत तीन पटींनी अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
ओमायक्रॉनला गांभीर्यानं घ्या : WHO
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी काल याबाबत माहिती दिली. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron Variant : ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष नको, गांभीर्यानं घ्या; WHO चा इशारा
- Omicron : दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवरील बंदी हटवली; युरोपियन युनियनचा महत्वपूर्ण निर्णय
- Omicron : चिंताजनक! बूस्टर डोसने ओमायक्रॉनविरोधात पूर्ण संरक्षण नाही : WHO चा इशारा, अधिक प्रभावी लस बनवण्याची गरज
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा