जगभरात ओमायक्रॉनचा कहर, बाधितांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ; WHO ने दिला इशारा
WHO warn world : जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत इशारा दिला आहे.
WHO On Omicron Variant : ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील एक आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनबाबत इशारा दिला असून अजूनही धोका 'अधिकच' असल्याचे सांगितले. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. ज्या देशांमध्ये डेल्टापेक्षा ओमायक्रॉन बाधितांची संख्या अधिक आहे, त्या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक माहिती म्हटले की, नव्या ओमायक्रॉनबाबतचा धोका अजूनही अधिकच आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक फैलावत असून अवघ्या दोन ते तीन दिवसात ही रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. या वेगामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या देशांमध्ये ब्रिटन आणि अमेरिकेचाही समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेत रुग्ण संख्येत घट
जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक बातमी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना बाधितांच्या संख्येत 29 टक्क्यांनी घट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉन व्हेरियंट आढळला होता. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्कमधील आकडेवारीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ठोस निष्कर्षासाठी आणखी आकडेवारीची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.
चीनमध्ये 200 बाधित आढळले
चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये 200 कोरोनाबाधित आढळले आहेत. मागील 20 महिन्यांतील ही सर्वाधिक दैनंदिन वाढ आहे. शांक्सी प्रांताची राजधानी शीआनमध्ये 150 बाधितांची नोंद करण्यात आली. 9 डिसेंबर ते सोमवारपर्यंत शीआनमध्ये 635 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरू
ब्रिटनमध्ये मागील 24 तासांमध्ये 98,515 कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये 1.2 कोटी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये 143 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.