लस न घेतलेल्या नागरिकांसाठी लॉकडाउनची घोषणा!; 'या' देशाचा निर्णय
Germany lockdown for unvaccinated people : लस न घेतलेल्या नागरिकांसाठी लॉकडाउन लावण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे.
Coronavirus Updates: कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन लागू केला होता. लस उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. मात्र, लसीकरणाला नकार देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिमेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. लसीकरण पूर्ण करण्यासाठी आणि कोरोनाची संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी जर्मनीने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांसाठी लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लस न घेतलेल्या नागरिकांना दोन-तीन अत्यावश्यक ठिकाणं वगळता कुठेही जाता येणार नाहीत.
जर्मनीच्या मावळत्या चान्सलर एजेंला मर्केल यांनी हा निर्णय 'राष्ट्रीय एकते'च्या भावनेतून घेण्यात आला असल्याचे सांगितले. लसीकरण झालेल्या नागरिकांना रेस्टोरंट्स, चित्रपटगृह, मनोरंजन स्थळे आदी ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तर, लस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश बंदी असणार आहे. जर्मनीत फेब्रुवारी महिन्यापर्यंत लसीकरण अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जर्मनीतील कोविडची चौथी लाट आतापर्यंतची सर्वात गंभीर आहे, गेल्या 24 तासांत आणखी 388 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओमायक्रॉन (omicron) विषाणूमुळेदेखील चिंता व्यक्त केली जात आहे. आगामी काही महिन्यात कोविडमधील निम्मी प्रकरणे ही ओमायक्रॉनशी संबंधित असण्याची भीती युरोपीयन युनियनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अमेरिकेनंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी, अमेरिकेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या 24 तास आधी कोविड 19ची चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक असेल. शिवायस प्रवाशांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, असे निर्बंध लावण्यात आले आहेत. हा नवा नियम पुढील आठवड्यापासून लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या 72 तासांआधीचा कोरोनो निगेटिव्ह अहवाल बंधनकारक होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron : अमेरिकेत ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय? न्यूयॉर्कमध्ये पाच बाधित आढळले
Omicron variant : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली, मृत्यू दरातही घसरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha