(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनावरील उपचारासाठी आणखी एक 'अस्त्र'; 'या' देशाने दिली गोळीला मंजुरी
Covid pill : औषध निर्माता कंपनी 'मर्क'ने ही कोरोनावरील गोळी विकसित केली आहे. या औषधाच्या माध्यमातून कोरोनाबाधितांवर घरीच उपचार करता येणे शक्य होणार आहे.
लंडन: कोरोना महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. कोविडबाधितांवर उपचार करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ब्रिटनने आता कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी अॅण्टीव्हायरल गोळीला सशर्त मंजुरी दिली आहे. अशी मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिलाच देश ठरला आहे. 'मोल्नुपिराविर' असे या औषधाचे नाव आहे. मात्र, ही गोळी कधी उपलब्ध होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
वय वर्ष १८ आणि त्यावरील वयाच्या कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी या गोळीचा वापर होणार आहे.
कोविडची सौम्य लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना ही गोळी दोनदा घ्यावी लागणार आहे. ही अॅण्टी व्हायरल गोळी कोरोनाच्या लक्षणांना कमी करत प्रकृतीत सुधारणा करण्यास मदतशीर ठरते. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी ही गोळी फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अमेरिका, युरोप आणि अन्य काही देशांमधील नियामक प्राधिकरण या औषधाची समीक्षा करत आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मागील महिन्यात म्हटले होते की, या गोळीची सुरक्षिता आणि परिणामकता याचे विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांची बैठक नोव्हेंबर महिन्यात बोलवणार आहे.
औषध निर्माता कंपनी 'मर्क'ने ही कोरोनावरील गोळी विकसित केली आहे. ऑक्टोबर महिन्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 'मोल्नुपिराविर'च्या 4, 80,000 डोस मिळाले. या औषधाच्या माध्यमातून थंडीच्या दिवसात हजारो लोकांना उपचार मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी म्हटले की, आमच्या देशासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. आम्ही कोरोनावरील औषधाला मंजुरी दिली. त्यामुळे आता घरीच उपचार घेता येणे शक्य होणार आहे.
मुंबईत 330 नव्या रुग्णांची नोंद, मृतांची संख्या घसरली
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी हजाराच्या जवळपास स्थिर आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयांना जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एकूण 1,141 रुग्णांची भर पडली आहे तर एकूण 32 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासामध्ये राज्यात एकूण 1,163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64,56,263 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.6 टक्के एवढे झाले आहे.