(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination : ब्रिटनने दोन डोसमधील अंतर कमी केलं, आठ आठवड्यात मिळणार कोरोनाचा दुसरा डोस
ब्रिटनने 50 वर्षावरील लोकांच्या लसीकरणासाठी दोन डोसमधील अंतर आठ आठवडे इतकं कमी केलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने दुसरा डोस लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लंडन : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ब्रिटनमध्ये आता लसीकरणाचा वेग वाढवला आहे. त्यासाठी कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम केवळ 50 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी लागू असणार आहे असं ब्रिटनच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिटनमध्ये आधी दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे होते. ते आता कमी करण्यात येऊन 8 आठवडे इतकं करण्यात आलं आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं की, 50 वर्षावरील नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी दुसरा डोस लवकर देण्यात येईल. भारतातील कोरोना म्युटंटमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यावर पंतप्रधानांनी चिंताही व्यक्त केली आहे.
भारतात कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवला असताना ब्रिटनने मात्र दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात दोन डोसमधील अंतर वाढवलं
सरकारच्या NTAGI या समितीने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. तर कोवॅक्सिनच्या डोसमधील अंतरात कोणताही बदल केलेला नाही.
गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस ऐच्छिक आहे, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर बाळांना स्तनपान करणाऱ्या माता प्रसुतीनंतर कधीही लस घेऊ शकतात. कोविड-19 पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांनी बरं झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारसही NTAGI समितीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :