Covid 19 Test: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणत्या कोविड -19 चाचण्या आवश्यक आहेत?
जगभरातील देश आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी दिली आहे.यासाठी कोणत्या कोविड -19 चाचण्या आवश्यक आहेत जाणून घ्या.
नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात हाहा:कार उडाला होता. अजूनही काही देशांमध्ये कोरोनाचा हैदोस सुरुचं आहे. या महामारीमध्ये कोट्यवधी लोकांनी आपले प्राण गमावले आहे. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून कोरोना संसर्गावर लसही उपलब्ध झाली आहे. मात्र, अजून संकट टळलेलं नसल्याने अनेक देशांमध्ये प्रवासावर निर्बंध आहेत. तर काही देशांमध्ये कोविड चाचणी असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. चला जाणून घेऊया की आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणती कोविड चाचणी आवश्यक आहे.
प्रत्येक देशात वेगवेगळ्या कोरोना चाचणी असल्याचे समोर आले आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत विषाणूच्या जेनेटीक मटेरिअल (अनुवांशिक सामग्री) शोध घेणारी चाचणी आवश्यक आहे किंवा अँटीजेन्स नावाची व्हायरल प्रथिने शोधणारी रॅपिड टेस्टही इथं स्वीकारली जाते. अमेरिकेत जाण्यापूर्वी यापैकी कोणतीही कोविड चाचणीला तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.
आरोग्य व्यावसायिक सामान्यत: अनुनासिक स्वॅबद्वारे अधिक संवेदनशील लॅब चाचण्या घेतात, ज्याचा रिझल्ट येण्यास एक दिवस किंवा अधिक वेळ लागतो. मात्र, रॅपिड चाचण्यांचा अहवाल 15 ते 30 मिनिटांमध्ये येतो. रॅपिड टेस्ट ऑफिस, शाळा आणि नर्सिंग होममध्ये लोकांना तपासण्यासाठी वापरल्या जातात.
अमेरिकेमध्ये वैद्यकीय प्रयोगशाळेमधून निगेटिव्ह अहवाल आलेले इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट पुरावा आवश्यक आहे. याचा अर्थ असा की आपण रॅपिड चाचणी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या अशा आरोग्य केंद्रात जावे लागेल जो हा दस्तऐवज प्रदान करू शकेल.
इंग्लंडमध्येही अशाच प्रकारची नियमावली आहे. दोन्हीपैकी कोणत्याही कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीला इथे प्रवेश दिला जातो. मात्र, तुम्ही केलेली कोविड चाचणी सर्व मानदंड वापरुन केलेली असावी. कारण, इंग्लडमधील आरोग्य अधिकारी तुमचा रिपोर्ट तपासतात. अशावेळी काही चूक सापडली तर प्रवासासाठी परवानगी मिळणार नाही.
देशांनी वेगवेगळ्या नियमावली जाहीर केल्यानंतर, युरोपियन युनियनमधील अधिकाऱ्यांनी 27 देशांच्या गटातील आवश्यकतांचे प्रमाणिकरण करण्यास सहमती दर्शविली.