China : जग भारतासोबत, मात्र चीनची उलटी चाल... दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा जाहीर, चीनी राजदूतांच्या भेटीनंतर पाकच्या माध्यमांचा दावा
China Support Pakistan : परिस्थिती कोणतीही असो, इस्लामाबादच्या पाठीमागे नेहमीच राहू असा विश्वास चीनने पाकिस्तानला दिल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेला जगभरातून पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे चीनने मात्र उलट्या दिशेने प्रवास सुरू केल्याची माहिती आहे. चीनचे राजदूत जियांग झैडोंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) यांची भेट घेतली. या भेटीनंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा दावा पाकिस्ताच्या माध्यमांनी केला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, त्यामुळे अशा अडचणीच्या वेळी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.
चीन नेहमीच पाकिस्तासोबत
चीनचे पाकिस्तानमधील राजदूत जियांग झैडोंग (Chinese Ambassador Jiang Zaidong) यांनी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी भारताच्या हल्ल्याचा पाकिस्तान सामना करू शकणार नाही, त्यामुळे चीनने पाकिस्ताला समर्थन द्यावं अशी मागणी झरदारी यांनी केली. त्यानंतर चीनने ते मान्य केलं असल्याचा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केला आहे.
दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्य कायम राहण्यासाठी चीन नेहमीच इस्लामाबादच्या पाठीमागे राहील असा विश्वास चीनने पाकिस्तानला दिल्याची माहिती आहे.
रशियाचा भारताला पाठिंबा
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासबोत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा केली आणि पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यातल्या दोषींना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा मिळायलाच हवी, यावर पुतीन यांनी जोर दिला.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदींना फोन करणारे पुतिन हे 18 वे जागतिक नेते आहेत. मोदींनी पुतिन यांना यावेळी भारत दौऱ्याचं निमंत्रण दिलं. दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली.
भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण खात्याचे सचिव राजेश कुमार सिंह यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधान मोदी यांच्या सात लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ही बैठक झाली. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.
या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना भेटले होते. त्यामुळे संरक्षण खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईची मोकळीक दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एखादी महत्त्वाची घटना घडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.























