ISRO Chandrayaan 3 : भारताच्या कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक! Google Doodle द्वारे चांद्रयान 3 मोहिमेच्या शुभेच्छा
Chandrayaan 3 Google Doodle : भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक करण्यात आलं आहे. चांद्रयान 3 चं खास डुडल बनवून गुगलने भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरलं आणि नवा इतिहास रचला गेला आहे. कोणत्याही देशाला जमलं नाही ते भारताने (India Moon Mission) करुन दाखवलं आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon's South Pole) उतरणारा पहिला देश ठरला आहे. जगभरातील सर्व देश आणि विविध देशाचे पुढारी, नेते यांच्याकडून भारत आणि इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता सर्च इंजिन गुगलने ही भारताला चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने खास गुगल डुडल बनवत भारताच्या चंद्रमोहिमेचं कौतुक केलं आहे.
खास डुडल बनवून गुगलकडून भारताला शुभेच्छा
गुगलने खास डुडल साकारलं आहे. यामध्ये चंद्राच्या भोवती चांद्रयान-3 प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. चंद्राच्या भोवती फिरल्यानंतर चांद्रयान (Chandrayaan-3) चंद्राच्या कायम अंधारात असलेल्या दक्षिण ध्रुवावर उतरतं आणि त्यातून मग रोव्हर बाहेर येतो, असं संपूण ॲनिमेशनच्या रुपातील डुडल साकारतं गुगलने भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक केलं आहे.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण
प्रत्येक भारतीयांसाठी चंद्रमोहिमेचं यश हा गर्व आणि अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण जगातून भारतावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांनीही भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचं कौतुक केलं आहे. युरोपियन स्पेस एजन्सी आणि अमेरिकन स्पेस एजन्सी म्हणजेच नासानं ही इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.
चांद्रयान-3 मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट काय?
भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फ असल्याचा शोध लावला होता, त्यानंतर आता चांद्रयान-3 चंद्रावर पाण्याचे साठे शोधणार आहे. चांद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर आता पुढील 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून तेथील माहिती गोळा करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे विविध फोटो काढून ही सर्व माहिती इस्रोला पाठवणे, हे चांद्रयान-3 चं काम आहे.
40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर लँडिंग
14 जुलै रोजी पृथ्वीवरून निघालेलं चांद्रयान-3 40 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचलं. भारताची ही ऐतिहासिक चंद्रमोहिम आहे. महत्त्वाचं म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पानं जोडलं गेलं आहे.
What is Google Doodle : गुगल डुडल म्हणजे काय?
गुगल डूडल (Google Doodle) हा सर्च इंजिन गुगल (Google) च्या होमपेजवरील लोगोमध्ये केलेला खास बदल आहे. गुगलकडून खास दिवस, कार्यक्रम, मोहिम किंवा उपक्रम तसेच उल्लेखनीय ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मरणार्थ डुडल साकारलं जातं.