Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर जाऊन काय करणार? चंद्रावर जाण्याचा अट्टहास नेमका कशासाठी?
Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-3 चंद्रावर जाऊन काय करणार? चंद्रावर जाण्याचा अट्टहास नेमका कशासाठी? हे जाणून घ्या.
मुंबई : भारत लवकरच नवा इतिहास रचणार आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारतच नाही तर, जगातील सर्व देश चंद्रावर उतरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, चंद्रावर असं नेमकं आहे तरी, काय ज्यासाठी सर्व देशांचा चंद्रावर पोहोचण्याची उत्सुकता आहे. हे जाणून घ्या.
चांद्रयान-3 चंद्रावर जाऊन काय करणार?
- चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मातीचा अभ्यास करणार
- पृथ्वी, सूर्यमाला, चंद्राच्या निर्मितीची अनेक रहस्ये शोधणार
- चंद्रावर सिलिकॉन लोह, टायटेनियमसारखी दुर्मीळ खनिजं शोधणार
- अब्जावधी वर्ष अंधार, प्रचंड थंडीतल्या मातीत बर्फाचे रेणू शोधणार
- बर्फ, पाण्याचा अंश सापडल्यास भविष्यातील मोहिमांना फायदा
- पाणी असल्यास चंद्रावर ऑक्सिजन, हायड्रोजनची निर्मिती शक्य
- ऑक्सिजन निर्मितीनंतर चंद्रावर मानवी वस्तीचं स्वप्न दृष्टिपथात
चंद्रावर जाण्याचा अट्टहास नेमका कशासाठी?
जगातील सर्व देश चंद्रावर उतरण्यासाठी स्पर्धेत आहेत. चंद्राबाबत जगभरातील देशांची वाढती उत्सुकता मोठी आहे, तिथे पोहोचण्यासाठी खूप स्पर्धा आहे आणि त्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लढत आहेत. पण, चंद्रावर असं नेमकं आहे तरी, काय ज्यासाठी सर्व देशांचा चंद्रावर पोहोचण्याची उत्सुकता आहे. अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याबाबत सविस्तर जाणून घ्या.
चंद्रावर खनिजांचे साठे
चंद्रावर अनेक प्रकारची खनिजे मिळत असल्याची बाब समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फ असल्याचा शोध लावला होता, त्यानंतर तेथे पाणी असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चंद्रावर हायड्रोजन, ऑक्सिजन, सिलिकॉन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अॅल्युमिनियम, मॅंगनीज आणि टायटॅनियन सारखी खनिजे असण्याची शक्यता आहे. नॅशनल सायन्स सोसायटीच्या अहवालानुसार, बेरिलियम, लिथियम, झिरकोनियम, निओबियम, टॅंटलम अशी अनेक दुर्मिळ खनिजेही चंद्रावर सापडण्याची शक्यता आहे.
चंद्रमोहिमेचा मानवाला काय फायदा?
चंद्राचा शोध तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. चंद्रावरील खनिज साठे मानवाला वापरता येतील, तसेच इतर नवीन संसाधनांचा शोध लागल्यास त्याचाही मानवाला फायदा होईल. चंद्रावर पाण्याचे साठे सापडल्यास भविष्यात तेथे मानवी वसाहती तयार केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे मानवाला चंद्रावर जीवन जगणं शक्य होईल.
चांद्रयान-3 मोहिम कशी आहे?
चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन म्हणजे पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात आला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करेल. त्यानंतर विक्रम लँडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती आणि दगड यांची नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. चांद्रयान 3 च्या लँडरचं नाव विक्रम (Vikram) आणि रोव्हरचं नाव प्रज्ञान (Pragyan) आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या