(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan-3 : 'मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!' चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 चा इस्रोसाठी खास मेसेज
Chandrayaan-3 ISRO Moon Mission Successful : भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आहे. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे.
मुंबई : भारताची 'शान' चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर लँड झालं आणि इतिहास रचला गेला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर इस्रोला हे यश मिळालं आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम फत्ते झाली आहे. भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आहे. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा क्षण आणि अशी ही कौतुकास्पद इस्रोची कामगिरी आहे.
''मी माझ्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आणि तुम्ही पण''
चांद्रयान-3 नं चंद्रावर पोहोचताच इस्रोला खास मेसेज पाठवला आहे. इस्रोने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, ''चांद्रयान-3 मिशन : भारतीयांनो, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण - चांद्रयान-3''. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत पोहोचलं आहे. भारताने जणू चंद्रच कवेत घेतला, अशी भावना आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 23, 2023
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर लँडिंग
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवस लागले. 14 जुलै रोजी पृथ्वीवरून निघालेलं चांद्रयान-3 आज 40 दिवसांनंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचलं. भारताची ही ऐतिहासिक चंद्रमोहिम आहे. महत्त्वाचं म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पानं जोडलं गेलं आहे.
देशभरात उत्साहाचं वातावरण
भारत आता चंद्रावर पोहोचल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक भारतीय इस्रोच्या शास्रज्ञांचं कौतुक करत आहे. 2019 रोजी इस्रोची चांद्रयान-3 मोहिम अयशस्वी झाली. त्यानंतर चार वर्षानंतर चंद्रमोहिमेत भारताला यश मिळालं आहे. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर त्यामध्ये इस्रोकडून अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आणि त्याचंच हे फळ ज्यामुळे भारत चंद्रावर पोहोचला आहे.
चांद्रयान-3 मोहिमेचे टप्पे
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर वेगळं होईल. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून तेथील माहिती आणि काही नमुने गोळा करेल. ही माहिती चांद्रयान-3 इस्रोला पाठवेल. चंद्राच्या पृष्ठभागाचे काढलेले विविध फोटो इस्रोला पाठवणे, हे काम आता चांद्रयान-3 ला करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :