Bao Fan : जॅक मा नंतर आणखी एक अब्जाधीश गायब; बँकर बाओ फॅन बेपत्ता, कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले
Billionaire Bao Fan Missing : 2020 साली अलिबाबाचे मालक जॅक मा बेपत्ता झाले होते. तीन महिन्यांनी ते समोर आले. त्यानंतर आता आणखी एक अब्जाधीश बेपत्ता झाले आहेत.
Chinese Billionaire Bao Fan Missing : चीनमधील एक अब्जाधीश बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या चीनमधील हाय प्रोफाईल अब्जाधीश बँकर बाओ फॅन बेपत्ता आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याचं सांगितलं जात आहे. बाओ फॅन यांची कंपनी चायना रेनेसॉन्स होल्डिंग्सने (Renaissance Holdings) हाँगकाँग स्टॉक एक्सेंचेज (चिनी शेअर बाजार) माहिती दिली आहे की, बाओ फॅन सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीच माहिती नाही. त्यांच्यासोबत सध्या कोणताच संपर्क नाही. ही माहिती समोर येताच चीनमध्ये आर्थिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.
अब्जाधीश बँकर बाओ फॅन बेपत्ता
बाओ फॅन यांच्या चायना रेनेसान्स होल्डिंग्स कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे. कंपनीने सांगितलं आहे, चायना रेनेसान्स होल्डिंग्सचे सीईओ बाओ फेन यांच्याशी अलीकडच्या काळात संपर्क होऊ शकला नाही. कंपनीने गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या मार्केट अपडेटमध्ये ही माहिती दिली आहे. बाओ फॅन हे चीनमधील आघाडीचे डील ब्रोकर आहे, ज्यांच्या क्लायंटमध्ये दीदी आणि मीटुआन सारख्या टेक दिग्गजांचा समावेश आहे. बाओ बेपत्ता असल्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यांच्या कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले आहेत.
बाओ बेपत्ता असल्याचा शेअर बाजारावर परिणाम
गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाच्या लाटेमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाल्याचं दिसून आलं. आता हळूहळू चीनची अर्थव्यवस्था सुधारत आहे. पण असं असतानाच अब्जाधीश बँकर बाओ फॅन बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बाओ फॅन चीनमधील सर्वात मोठ्या बँकर्सपैकी एक आहेत. बाओ अब्जाधीश बँकर असल्याने त्यांचं बेपत्ता होणं, ही असामान्य बाब नाही. बाओ यांची गणना चीनमधील सर्वात उच्च-प्रोफाईल बँकर्समध्ये केली जाते. त्यामुळे बाओ बेपत्ता झाल्याचा परिणाम त्यांच्या कंपनीवर तसेच देशाच्या बँकिंगवर होत आहे.
कोण आहेत बाओ फॅन?
बाओ फॅन हे चीनच्या फिनटेक मार्केटमधील एक मोठं नाव आहे. ते चायना रेनेसान्स कंपनीचे मालक आहेत. चायना रेनेसान्स 2018 मध्ये हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजच्या यादीत आलं. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर 2021 मध्ये त्यांची लिस्टिंग देखील दोन वर्षांपूर्वी झाली होती. बाओ फॅन यांनी ही कंपनी सुमारे 18 वर्षांपूर्वी सुरु केली. फॅन यांच्याकडे या कंपनीचे 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाओ यांनी चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील काही मोठ्या डीलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या ब्रोकिंग लिस्टमध्ये दीदी, कुएदी, फूड डिलिव्हरी कंपन्या Meituan आणि Dianping आणि इतर अनेक मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे.
जॅक माही झाले होते बेपत्ता
2020 साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि अलीबाबा ग्रुपचे मालक जॅक मा बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. ते तीन महिने बेपत्ता होते. त्यांनी चीनच्या आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर जोरदार टीका केली. यानंतर त्यांचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतही त्यांचा वाद झाला. त्यानंतर ते बेपत्ता होते. पण तीन महिन्यानंतर ते सुखरुप सर्वांसमोर आले. त्यानंतर त्यांच्या कंपनीचे शेअर्स वाढले होते.