Animal Testing : अमेरिकेत दरवर्षी 11 कोटी प्राण्यांचा बळी, औषध बनवण्यासाठी केल्या जातात चाचण्या
Animal Lab Trials : दरवर्षी अमेरिकेत 11 कोटी प्राण्यांचा प्रयोगशाळेतील चाचण्यांमुळे मृत्यू होतो, असं पेटा (PETA) संस्थेच्या अहवालात समोर आलं आहे.
Animal Lab Trials : दरवर्षी अमेरिकेत 11 कोटी प्राण्यांचा प्रयोगशाळेतील चाचण्यांमुळे मृत्यू होतो, असं पेटा (PETA) संस्थेच्या अहवालात समोर आलं आहे. काही प्राण्यांवर औषधांसाठी, तर काही प्राण्यांवर सौंदर्यप्रसाधनांसाठी चाचण्या केल्या जातात. प्राण्यांवर औषधे आणि सौंदर्यप्रसाधनं तपासली जातात. काही प्राण्यांना विषारी गॅसचाही वापर करण्यात येतो. या चाचण्यांसाठी प्राण्यांना लोखंडी पिंजऱ्यांमध्ये ठेवले जाते, जिथे त्यांना हालचालही करता येत नाही. प्राण्यांवर वेगवेगळ्या चाचण्या आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर फक्त 20 टक्के प्रकरणांमध्ये प्राण्यांना वेदना कमी करण्यासाठी औषध दिलं जातं. त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागतात.
पेटा संस्था काय काम करते?
पेटा ही प्राण्यांच्या नैतिक अधिकारांसाठी लढणारी (PETA - People for the Ethical Treatment of Animals) संस्था आहे. ही संख्या विना नफा काम (Nonprofit organization) करते. ही संस्था प्राण्यांचा अवैध वापर, खरेदी-विक्री, प्राण्यांवर चाचणी अशा प्रकारे प्राण्यांचे शोषण करणाऱ्यांविरोधात काम करते.
औषधांच्या मानवी चाचणीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. पण प्राण्यांच्या चाचणीच्या वेळी प्राणी किंवा पक्ष्यांची निवड कशी होते माहित आहे का?
कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केले जातात?
सामान्यतः प्रत्येक उत्पादनाची मानवी चाचणी करण्याआधी प्राणी किंवा पक्ष्यांवर त्याची चाचणी केली जाते. यामध्ये माकडे, ससे, उंदीर, बेडूक, मासे, डुक्कर, घोडे, मेंढ्या, मासे आणि अनेक प्रकारचे पक्षी यांचा समावेश होतो. याआधी चिंपांझींवरही अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जात होत्या, परंतु आता बहुतेक देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक प्रयोगशाळांमध्ये अवैध चाचण्याही करण्यात येतात.
चाचणीसाठी प्राणी कसे निवडतात?
चाचणीसाठी बहुतेक प्राण्यांचं पालनपोषण या उद्देशाने केलं जातं. म्हणजेच त्या प्राण्यांना ते केवळ प्रयोगांसाठी या जगात आणले जातात. अशा जनावरांचा पुरवठा करणारे डीलर वेगळे असतात, ज्यांच्याकडे या कामासाठी आवश्यक परवाना असतो. या व्यतिरिक्त लोक अवैध प्रकारेही प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठी प्राणी पुरवतात.
प्रयोगशाळेत या प्राण्यांसोबत काय होतं?
प्रयोगशाळेतील चाचणीवेळी प्राण्यांना खूप त्रास आणि वेदना सहन कराव्या लागतात. त्यापूर्वी प्राण्यांना एकाकीपणा आणि भुकेचा सामना करावा लागतो. प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवले जातं. त्यांच्यावर विषारी गॅस आणि औषध वापरली जातात. बहुतेक प्राण्यांचा प्रयोगशाळेतील चाचण्यांदरम्यान मृत्यू होतो.
कोणत्या देशात काय कायदा आहे?
प्राण्यांवरील चाचणीबाबत प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे नियम आणि कायदे आहेत. भारतामध्ये सौंदर्यप्रसाधनांसाठी प्राण्यांच्या चाचणीवर बंदी आहे. भारतात आयपीसीच्या कलम 428 आणि कलम 429 नुसार कोणताही प्राणी किंवा पक्षी, मग तो पाळीव असो वा जंगली प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. क्रीम-पावडर किंवा लिपस्टिक-शॅम्पूसाठी औषध आणि सौंदर्यप्रसाधने कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्यावर चाचणी करण्यावर बंदी आहे. औषधांसाठीच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठी सरकारने नियम लागू केले आहेत.