(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jeff Bezos : पुन्हा तरुण होण्याच्या फॉर्म्युल्याचा शोध सुरु; जेफ बेझोसची स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक
मानवी पेशींचे रिप्रोग्रॅमिंग (Reprogramming Human Cells) करणे आणि त्या माध्यमातून पुन्हा तारुण्य प्राप्त करणं यावर अल्टोज् लॅब ही स्टार्टअप कंपनी काम करत आहे.
Reprogramming Human Cells : आपलं तारुण्य चिरकाल टिकावं असं कुणाला वाटत नाही? वय वाढत चालल्यानंतर पुन्हा तरुण दिसण्यासाठी काय-काय खटाटोपी केल्या जातात ते आजूबाजूला पाहिल्यानंतर दिसून येतं. तारुण्याचा फॉर्म्युला शोधण्याच्या संकल्पनेवर अनेक हॉलिवूडपट तयार झाले आहेत. पण ही संकल्पना सत्यात आली तर? येत्या काही वर्षात किंवा दशकात ही संकल्पना सत्यात येऊ शकते. अॅमेझॉनचा संस्थापक जेफ बेझोसने रशियाच्या अब्जाधीश युरी मिलनेर याच्यासोबत मिळून एका बायोटेक स्टार्टअपला मोठं फंडिंग केल्याची चर्चा आहे. मानवी पेशींचे रिप्रोग्रॅमिंग करणे आणि त्या माध्यमातून पुन्हा तारुण्य प्राप्त करणं यावर ही स्टार्टअप कंपनी काम करत आहे. (Jeff Bezos Funds An Anti Ageing Startup Working On Reprogramming Human Cells).
अल्टोज् लॅब, अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमधील सध्या चर्चेत असणाऱ्या स्टार्टअपमधील एक स्टार्टअप कंपनी. या वर्षाच्या सुरुवातीला अल्टोज् लॅबची स्थापना करण्यात आली तिचं काम सुरु झालं. या स्टार्टअपमधील सर्वात महत्वाचा गुंतवणूकदार असलेल्या युरी मिलनरच्या 'पॅलो अस्टो' या प्रशस्त आणि अलिशान पॅलेस म्हणजे आपल्या भाषेतील वाड्याच्या नावावरुन या कंपनीचे नाव ठेवण्यात आलं आहे.
'अॅन्टी एजिंग फॉर्म्युला'चा शोध सुरु
या कंपनीच्या संशोधानाचा उद्देश हा मानवी पेशींचा अभ्यास करणे आणि त्यावरुन अॅन्टी एजिंग फॉर्म्युला म्हणजे तारुण्य चिरकाल टिकवण्याच्या फॉर्म्युल्याचा शोध घेणं हा आहे. अल्टोज् लॅबमध्ये काम करण्यासाठी जगभरातून अत्यंत बुद्धीमान शास्त्रज्ञांनी भरती सुरु आहे. एमआयटी टेकच्या मते, या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना वर्षाला किमान एक मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास साडे सात कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे.
शिन्या यामानाका यांच्या फॉर्म्युल्यावर काम
अल्टोज् लॅबच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ शिन्या यामानाका यांची निवड करण्यात आली आहे. शिन्या यामानाका यांना त्यांच्या रिप्रोग्रॅमिंग थेअरीच्या संशोधनासाठी 2012 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. याच रिप्रोग्रॅमिंग थेअरीवर या प्रोजेक्टमध्ये काम करण्यात येत आहे.
रिप्रोग्रॅमिंग थेअरीमध्ये मानवी पेशींमध्ये प्रोटिनचे अशा पद्धतीने प्रत्यारोपन केलं जातं की त्यामुळे त्या पेशी स्टेम सेल प्रमाणे पुन्हा मूळ पदावर येतात. याच प्रकारे मानवी पेशींवर प्रयोग करुन मानवाचे वय पुन्हा कमी करण्याचे म्हणजे तारुण्य परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
Ghost Cities : चीनमधील ' भुताची शहरं' पुन्हा गजबजणार? उद्योग आणि नागरिक परतीच्या वाटेवर
शिन्या यामानाका यांच्या व्यतिरिक्त डॉ. जुआन कार्लोस बेलमॉन्ट (माकडाच्या गर्भात मानवी सेलचे प्रत्यारोपण करणारे), डॉ. स्टिव्हन होवार्थ (मानव आणि प्राण्यांच्या वयाचे विश्लेषक), डॉ. वोल्फ रेक (रिप्रोग्रॅमिंग प्रयोगाचा अनुभव असलेले) डॉ. पीटर वॉल्टर (मेमरी फक्शनिंग एक्सपर्ट) तसेच नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर डाऊना आणि मॅन्युएल सेरॅनो यांचा समावेश आहे.
जेफ बेझोसच्या गुंतवणुकीनंतर अल्टोज् लॅब या कामाला अधिक व्यापक स्वरुप प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे. केंब्रिज, सॅन दिएगो, बे अॅना आणि जपान ठिकाणीही या प्रोजेक्टवर संशोधनाचं काम सुरु करण्यात येणार आहे.
मनुष्याला तारुण्य परत मिळवून देण्याच्या फॉर्मुल्याचा शोध घेणं याबद्ल जेफ बेझोसचा हा प्रयत्न काही नवीन नाही. या आधीही अमेझॉनच्या संस्थापकाने 2018 साली युनिटी टेक्नॉलॉजी या अॅन्टी एजिंग थेरपीवर संशोधन करणाऱ्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.'
जगात अनेक शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि संस्था या मानवाचे तारुण्य चिरकाल टिकवण्यासाठी असलेल्या फॉर्म्युल्याच्या शोधात आहेत. हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांची मध्यवर्ती संकल्पना असलेल्या अॅन्टी एजिंग फॉर्म्युलावर येत्या काळात शोध लागल्यास आणि मानवाने आपले तारुण्य परत मिळवल्यास नवल वाटू नये.
Singapore : सिंगापूरचे 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पाऊल, विना चालक बसची सुरुवात