Afghanistan : परिस्थिती चिघळणार? काबुल एयरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा गोळीबार, पाच जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
काबुल एयरपोर्टवर आपापल्या देशात जाण्यासाठी हजारो नागरिक जमले असताना अमेरिकेच्या सैन्याने हा गोळीबार केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
काबुल : आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका करायला गेलेल्या अमेरिकन सैन्याने काबुल एयरपोर्टवर गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात किमान पाच लोक मृत्यूमुखी पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत. रॉयरटर्स या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. काबुल एयरपोर्टवर आपापल्या देशात जाण्यासाठी हजारो नागरिक जमले असताना अमेरिकेच्या सैन्याने हा गोळीबार केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
At least five killed at Kabul airport - witnesses https://t.co/1dmvH5cVN8 pic.twitter.com/PHizU3QbHn
— Reuters (@Reuters) August 16, 2021
अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या 60 हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे.
आपल्या दूतावासातील कर्मचारी आणि नागरिकांना तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी अमेरिकेच्या सहा हजार सैन्याची एक तुकडी अफगाणिस्तानमध्ये गेली आहे. त्यांनी अमेरिकन दूतावास संपूर्णपणे रिकामं केलं आहे.
भारतानेही रविवारी आपल्या 124 नागरिकांना आणि इतर अफगाणी नागरिकांना सुखरुपपणे भारतात परत आणले. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने एयर इंडियाला अद्याप दोन विमानं तयारीत ठेवायला सांगितलं आहे. ब्रिटनने आपल्या दूतावासातील अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी 600 सैनिकांची तुकडी पाठवली.
संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अॅन्टोनिया गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असं आवाहन केलं होतं. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली होती.
UNSC ची अफगान प्रश्नावर आज बैठक
अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर अनागोंदी माजली असून या विषयावर भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या बैठकीचे अध्यक्ष असतील.
भारतासहित जगातल्या प्रमुख राष्ट्रांचे अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. आजच्या बैठकीत तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर प्रस्थापित केलेल्या नियंत्रणावर चर्चा होणार आहे. पण अफगाणिस्तानच्या प्रश्नावर त्या देशाची बाजू कोण आणि कशा प्रकारे मांडणार, त्या संबंधी पुढाकार कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या :
- Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार
- IN PICS : तालिबानने कब्जा केल्यानंतर आजच्या अफगाणिस्तानचे चित्र कसं आहे?
- Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला