Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला
Taliban : तालिबानने 25 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह यांची निर्घृणपणे हत्या केली होती आणि त्यांचा मृतदेह एका खांबाला लटकवला होता.
काबुल : तालिबानने काबुलवर कब्जा मिळवताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन करण्याचा निर्णय घेतला. आता तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनवर पूर्ण कब्जा मिळवला आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल घनी ब्रार हा अफगाणिस्तानचा सत्ताधीश म्हणून काम करु शकतो. आजपासून 25 वर्षापूर्वीही तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण प्रस्थापित केलं होतं आणि तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांची निर्घृणपणे हत्या करुन त्यांचा मृतदेह एका खांबाला लटकावला होता.
कम्युनिस्ट विचारसरणीचं सरकार
अफगाणिस्तानमध्ये 1984 साली पीपर्ल डेमोक्रॅटिक पार्टी ही सत्तेत होती. हा पक्ष एक कम्युनिस्ट विचारसरणीचा पक्ष होता. सोव्हिएत रशियाच्या मदतीने नजीबुल्लाह हे त्यावेळी राष्ट्रपती झाले आणि त्यांनी देशाच्या अमुलाग्र बदल करायला सुरुवात केली. नजीबुल्लाह यांनी देशाची राज्यघटना निर्माण केली आणि देशाचे नाव रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान असं केलं. त्यांनी महिलांना अनेक हक्क प्रदान केले आणि महत्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्वाची अंमलबजावणी सुरु केली. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांत मोठी नाराजी होती. त्यामुळे कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानला लोकांचं मोठं समर्थन मिळू लागलं.
सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर अफगाणिस्तानला मिळणारी रसद बंद झाली. त्याचवेळी पाकिस्तान आणि तालिबान या दहशतवादी गटाला अमेरिकेची मोठी रसद सुरु होती. अमेरिकेच्या आणि पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्याच्या मदतीन तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं.
दरम्यान, नजिबुल्लाह यांनी शॉर्टव्हेव रेडिओच्या माध्यमातून यूएन कडे मदत मागितली. पण ती त्यांना मिळाली नाही. काबुलवर तालिबान्यांनी नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती नजिबुल्लाह यांना आपल्याला शरण येण्यास सांगितलं. पण नजिबुल्लाह यांनी तसं करण्यास नकार दिल्यानंतर तालिबान्यांनी त्यांना फरफटत नेलं.
तालिबान्यांनी शेवटी नजीबुल्लाह यांना एका ट्रकच्या मागे बांधून रस्त्यावरुन फरफटत नेलं आणि नंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. एवढ करुनही त्यांनी राष्ट्रपतींच्या मृतदेहाला एका विजेच्या खांबाला लटकावलं. महत्वाचं म्हणजे त्याच खांबावर राष्ट्रपतींच्या भावाचा मृतदेह लटकत होता.
आज पुन्हा एकदा तालिबान्यांनी अफगाणिस्तावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. आता त्या देशातील महिला, बालके, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
- Afghanistan News: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाईची पहिली प्रतिक्रिया
- Afghanistan President Resigns: अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांची तालिबान्यांसमोर शरणागती!
- अफगाणिस्तान: राष्ट्रपती अशरफ घनी लवकरच राजीनामा देण्याची शक्यता; शांततेने आत्मसमर्पण करण्याची तालिबान्यांची मागणी