Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार
Taliban : पाकिस्तानमार्गे काबुलला गेलेले हे विमान विमानतळावर उतरवण्यात आलं आणि जर विमानतळावर तालिबान्यांचे नियंत्रण आलं असतं तर 124 प्रवासी असलेल्या भारतीय विमानाचे अपहरण होण्याचा जास्त धोका होता.
नवी दिल्ली : विमान काबुलमध्ये उतरल्यास अपहरणाची भीती, न उतरल्यास 124 भारतीयांचा जीव धोक्यात, लॅन्डिंग क्लियरन्ससाठी आकाशात 12 चकरा, त्यामुळे इंधन संपण्याची भीती. अशा सर्व अडचणींचा सामना करत एयर इंडियाचे अफगाणिस्तानला गेलेलं AI-243 हे शेवटचं विमान अखेर काल रात्री सुखरुपपणे भारतात दाखल झालं.
अफगाणिस्तानमधील भारतीयांना सुखरुपपणे परत आणण्यासाठी पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर करुन गेलेले एअर इंडियाचे AI-243 हे शेवटचे विमान काल रात्री उशीरा दिल्लीमध्ये पोहोचलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अफगाणिस्तानवर आता तालिबान्यांनी नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर काबुल ते दिल्ली दरम्यानचं हे एअर इंडियाचे शेवटचे उड्डाण होतं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले असून राष्ट्रपती भवनावर आता तालिबानी दहशतवाद्यांचा कब्जा आहे.
पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर आणि इंधन संपण्याचा धोका
तालिबानी दहशतवादी संघटनेने काबुल ताब्यात घेतलं असताना त्या शहरातील भारतीय नागरिकांना सुखरुपपणे परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले होते. तिथे फसलेल्या जवळपास 124 भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या AI-243 या शेवटच्या विमानाने रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान उड्डाण केलं. त्यासाठी पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करण्यात आला.
एअर इंडियाचे विमान काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं पण त्याला लॅन्डिंगची परवानगी देण्यात येत नव्हती. एक वेळ अशी आली की आता एअर इंडियाचे विमान काबुल विमानतळावर उतरु शकेल की नाही याबाबत शंका उपस्थित झाली. त्यामुळे त्या विमानाला आकाशात जवळपास 12 चकरा माराव्या लागल्या. या दरम्यान विमानातील इंधन संपण्याचा धोका निर्माण झाला होता.
विमानाचे अपहरण होण्याचा धोका
तशा स्थितीत जर विमान काबुल विमानतळावर उतरवण्यात आलं आणि जर विमानतळावर तालिबान्यांचे नियंत्रण आले असते तर मदतीसाठी गेलेल्या भारतीय विमानाचे अपहरण होण्याचा जास्त धोका होता. आकाशात 12 चकरा मारल्यानंतर, सर्वकाही सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर शेवटी एअर इंडियाच्या त्या विमानाला लॅन्डिंगची परवानगी देण्यात आली.
एअर इंडियाचे हे विमान भारतीयांच्या मदतीसाठी गेलेले शेवटचे विमान होते. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा आणि भारतात सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटना या कंदहारमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करु शकतात अशी शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली होती. त्यामुळे या आधीच भारताने आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना विशेष विमानाने सुरक्षित भारतात आणलं आहे. अफगाणिस्तानच्या अनेक भागात प्रचंड हिंसाचार पाहता या आधीच व्यावसायिक उड्डाणे बंद करण्यात आली होती. देशातील व्यावसायिक विमान उड्डाण बंद होण्याआधी भारतात निघून या असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला होता.
अफगाणिस्तामधील परिस्थीती लक्षात घेता भारत सरकारने एअर इंडियाला अद्याप दोन विमानं तयारीत ठेवायला सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
- Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला
- Afghanistan News: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाईची पहिली प्रतिक्रिया
- Afghanistan President Resigns: अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांची तालिबान्यांसमोर शरणागती!