Maharashtra CM Oath Ceremony: उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्याला जाणार का?
Maharashtra CM Oath Ceremony: शपथविधी सोहळ्याला राज्यासह देशभरातील बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच राज्यातील माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार, इतर पक्षांचे नेते यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
मुंबई: राज्यात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. काल (बुधवारी) महायुतीतील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ देणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) , शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, या सोहळ्याची मुंबईतील आझाद मैदानावर मोठी तयारी करण्यात आली आहे, त्याचबरोबर या शपथविधी सोहळ्याला राज्यासह देशभरातील बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच राज्यातील माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार, इतर पक्षांचे नेते यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याला शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
शपथविधी सोहळ्याला उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील जाणार नसल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दोन्ही नेते आज मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर आली. राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथविधीचा निमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे, मात्र शपथविधी कार्यक्रमाला ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
कोणते नेते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत
आज मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीसाठी राज ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे हे नेते उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव राज ठाकरे येऊ शकणार नाहीत, असं त्यांनी फडणवीसांना कळवलं असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना देखील फोन करून शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना कळवलं असल्याची माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे.
त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आहे. नाना पटोले हे आज त्यांच्या साकोली विधानसभा मतदार संघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्यानं ते मुंबईतील या सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.