Washim News : मासळी पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या जाण्याने हळहळ
Washim News : वाशिमच्या मानोरा तालुक्यात खोल पाण्यातील मासळी पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वाशिम : वाशिमच्या (Washim) मानोरा तालुक्यातील आमगव्हाण इथं धोकादायक पद्धतीने इलेक्ट्रिक वायरने बांबूला लावून खोल पाण्यातील मासळी पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतशिवारातील गोखील नाल्यावर ही घटना घडली आहे. धनंजय कटारे वय 44 वर्षे आणि गणपत कटारे वय 46 वर्षे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. चुकीच्या पद्धतीने मासे पकडण्याचा प्रयत्न केल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तसेच या घटनेमुळे मानोरा आमगव्हाण या गावामध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.
आमगव्हाण ते कोंडोली दरम्यान असलेल्या शेतशिवरात गोखी नाल्यावर धनंजय आणि गणपत हे सकाळी घरातून मासे पकडण्यासाठी गेले होते. पण दुपारी उशीरापर्यंत घरी न आल्याने घरच्या लोकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण परिसरात दोघांचा शोध सुरु होता. त्यावेळी दुपारच्या सुमारास पाण्यात या दोघांचेही मृतदेह आढळून आले. शासकीय रुग्णालयात या दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच या प्रकरणी नातेवाईक गजानन कटारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू
धनंजय आणि गणपत हे दोघेही एकचा कुटुंबातील व्यक्ती होते. त्यामुळे गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जातेय. धनंजय कटारे आणि गणपत कटारे हे दोघेही सुस्वभावाचे व्यक्ती म्हणून गावात परिचित होते. त्यांचा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाल्याने गावामध्ये एकच शोककळा पसरली. या प्रकरणी मानोरा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. अशा धोकादायक पद्धतीचा अवलंब न करता प्रशासनाने योग्य ती पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर अपघात
समृद्धी महामार्ग (Samrudhhi Highway) प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. असाच एक भीषण अपघात समृद्धी महार्गावरील वाशिमच्या (Washim) कारंजाजवळ लोकेशन क्रमांक 173 वर झाला आहे. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसने ट्रकला जोरदार धडक(Accident) दिली आहे. ज्यामध्ये बसमधल्या 16 ते 17 प्रवासी जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली होती. हा अपघात 1 फेब्रुवारीच्या रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास झाला. समृद्धी महार्गावर प्रवास करताना अचानक नीलगाय रस्त्यावर आडवी आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात होते.