वीजेच्या तारा शेतात पडल्या, 2 सख्खे चुलत भाऊ ठार; मुलांना शोधण्यास गेलेल्या वडिलांचाही करंट लागून मृत्यू
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावातील शेत शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे.
वाशिम : शेतात फवारणीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. वाशिमच्या पांगरी महादेव गावच्या शेत शिवरातील या घनटेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेतातील विद्युत तारेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्युत विभागाला (Mahavitran) याबाबत माहिती दिली. मात्र, विजेचा धक्का लागून कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, महावितरण विभागाच्या कारभारावर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावातील शेत शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. शेतात पिकाची फवारणी करण्यासाठी गेलेल्या दोन सख्या चुलत भावांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळच्या सुमारास उघड झाली आहे. अशोक माणिक पवार 38 (वडील) मारोती अशोक पवार 20(मुलगा) आणि दत्ता राजू पवार 18 (पुतण्या) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्याचं दोन्ही भावाच्या लक्षात न आल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही भाऊ उशिरापर्यंत घरी का नाही आले, हे पाहण्यासाठी वडील घटनास्थळी गेले असता त्यांनाही विद्युत तारेचा धक्का लागला आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनीही पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर परिसरात आणि गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास मंगरूळपीर पोलीस करत आहेत.