(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई
Wardha Deoli : भूमिपूजन सोहळ्या दरम्यान ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वर्धा : आमदार रणजित कांबळे (MLA Ranjit Kamble) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार रणजित कांबळे यांनी वर्ध्यातील देवळी तालुक्यातील सोनेगावं येथे ग्रामपंचायत (Grampanchyat) सदस्य गणेश सातव याला मारहाण केली होती. गावातील एका भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार रणजित कांबळे यांना ग्रामपंचायतीच्या सदस्याने रखडलेल्या कामांविषयी विचारणा केली. तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले तरीही अद्याप काम सुरु झाले नसल्याबाबत सातव याने विचारणा केली. त्यावेळी आमदार रणजित कांबळे यांनी त्याला मारहाण केली असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान ग्रामपंचायत सदस्य रणजित सातव याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आज म्हणजेच रविवार (5 नोव्हेंबर) रोजी देवळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आता या प्रकरणात रणजित कांबळे यांच्याकडून कोणते स्पष्टीकरण येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नेमकं प्रकरण काय?
देवळी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सोनेगाव बाई येथे 2 नोव्हेंबर रोजी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित होता. यावेळी भूमिपूजनानंतर कामे होत नसल्याचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव यांनी आमदारांना केला. यावर आमदार रणजित कांबळे संतापले, राग अनावर झाला आणि सदस्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव याने पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत देवळी पोलिसांत तक्रार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आमदारांनी प्रश्नाची उत्तरे द्यावी. कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.
भाजपकडून कारवाईची मागणी
देवळीचे आमदार रणजित कांबळे यांना सभेत रस्त्याबाबत प्रश्न विचारला असता आमदाराने ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव याने देवळी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेनंतरही आमदारांवर कारवाई होत नसल्याने भाजपने पत्रकार परिषद घेत कारवाईची मागणी केली.
ग्रामपंचायत सदस्यात मारहाण करणे अयोग्य आहे. प्रोटोकॉलनुसार भूमिपूजन करावे. कामे पूर्ण करावी पण तसे होत नाही, त्यामुळे आमदार कांबळेंवर कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी केली आहे. आमदार कांबळे यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा त्यांना गावबंदी करू, असा इशारा भाजप नेते राजेश बकाणे यांनी दिला आहे.
या प्रकरणात आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरीही याबाबत रणजित कांबळे यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेली नाही. त्यामुळे यावर रणजित कांबळे काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.