(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्ध्यात एकतर्फी प्रेमाची क्रूरता; तरुणीला घराबाहेर बोलवलं, नंतर अंगणात चाकूने गळ्यावर वार करत केला खून
घराबाबेर कोणीतरी आवाज दिल्याने तरूणी घराबाहेर आली. घराबाहेर अंगणात दबा धरून बसलेल्या तरूणांनी मागून येऊन चाकूने तरूणीच्या गळ्यावर सपासप वार केले.
वर्धा : एकतर्फी प्रेम प्रकराणातून वर्ध्यात (Wardha Crime News) एका 23 वर्षीय तरुणीची तिच्याच घराबाहेर हत्या करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना वर्ध्यातील सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे घडली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे. या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाही. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यांमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या नालवाडी येथील दोन तरुण दहेगाव गोसावी येथे आले. या दोन मुलांसोबत दोन तरूणी देखील होत्या. या दोन मुलींनी मृत मुलीच्या घराच्या गेटजवळून बाहेर येण्यासाठी आवाज दिला. घराबाबेर कोणीतरी आवाज दिल्याने तरूणी घराबाहेर आली. घराबाहेर अंगणात दबा धरून बसलेल्या तरूणांनी मागून येऊन चाकूने तरूणीच्या गळ्यावर सपासप वार केले. आरडाओरडा झाल्यानंतर घरातील लोक बाहेर आले. मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून हादरले तात्काळ जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे.
घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण
चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करत पकडले. गावकऱ्याांनी चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दहेगाव गोसावी येथे या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले आणि कडक कारवाईची मागणी केली. या थरारक घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच रोष आहे. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरण घडले होते, राज्यभर खळबळ माजली होती. या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होत आहे.