Wardha Politics : मंत्री संजय राठोड-माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
मागील 1 वर्षा पूर्वी शिवसेना नेतृत्वाच्या असहकाराने कंटाळून त्यांनी काँग्रेसची सोबत स्वीकारली आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी राज्यात अचानक घडलेल्या आणि अनपेक्षित राजकीय समीकरण पूर्णतः बदलल्या गेले आहे.
Wardha : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी 1 ऑक्टोबरला शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आणि सध्या काँग्रेसचा हात पकडलेले हिंगणघाटचे अशोक शिंदे (Ashok Shinde) यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली. या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वर्ध्यात राजकीय चर्चेला पेव फुटले आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.
शिवसेनेचे वर्धा जिल्ह्यातील (Wardha) संस्थापक म्हणून अशोक शिंदे यांची ओळख आहे. 1995 साली अटीतटीच्या निवडणुकीत शिंदे यांनी शरद जोशी यांचा पराभव करून पूर्व विदर्भात सर्वात पहिले सेनेचे (First Shivsena MLA) आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. तीन वेळा त्यांनी शिवसेना आमदार म्हणून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु मागील एक वर्षा पूर्वी शिवसेना नेतृत्वाच्या असहकाराने कंटाळून त्यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसची सोबत स्वीकारली आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी राज्यात अचानक घडलेल्या आणि अनपेक्षित अशा राजकीय महाभूकंपाने राजकीय समीकरण पूर्णतः बदलल्या गेले आहे.
त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
पूर्वाश्रमींच्या सर्व शिवसैनिकांना शिंदे गटात घेण्याचा प्रयत्न केलेला असून त्याच दृष्टिकोनातून ना. संजय राठोड यांनी माजी आमदार अशोक शिंदे यांची भेट घेऊन चाचपणी केल्याची चर्चा आहे. ना. राठोड यांना त्याकाळी शिवसेनेत आणण्याची भूमिका अशोक शिंदे यांनीच पार पाडली होती. या भेटी संदर्भात अशोक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. शिवसेनेत असताना आम्ही चांगले मित्र होतो व आताही आहोत. या भेटीमागे राजकारण नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माजी नगराध्यक्ष सुधा शिंदे यांनी सूचक मौन बाळगले व कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र ना. राठोड यांनी अचानक घेतलेल्या या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या