(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : वर्ध्यातून मातोश्रीवर पोहचणार शिवसैनिकांची निष्ठा यात्रा; 9 दिवसात 864 किमीचा प्रवास करणार सायकलने
Shiv Sena Nishtha Yatra : उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी वर्ध्यातून शिवसैनिकांची निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत 9 दिवसात वर्धा ते मुंबई असा सायकलने 864 किमीचा प्रवास केला जाणार आहे.
वर्धा : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना समर्थन देण्यासाठी वर्ध्यातून शिवसैनिकांची (Shivsena) निष्ठा यात्रा (Shiv Sena Nishtha Yatra) काढण्यात येणार आहे. वर्धा ते मुंबई असे 864 किलोमीटर अंतर सायकल ने कापत 9 दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार 23 डिसेंबरला या निष्ठा यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. देशात आणि राज्यात वाढती बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल व आरोग्याच्या समस्या इत्यादींवर या जनजागृती यात्रेमधून करण्यात येणार आहे.
वर्धा ते मुंबई सायकल यात्रा
वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शनिवार, 23 डिसेंबरला ही निष्ठा यात्रा निघणार आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना या यात्रेत सहभागी होणार आहे. वर्धा ते मुंबई असे 864 किलोमीटर अंतर हे सायकल ने कापत 9 दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार आहे. या प्रवासादरम्यान अजघडीला भेडसावत असणाऱ्या समस्या, बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल व आरोग्याच्या समस्या इत्यादि विषयांवर चर्चा या यात्रेमधून केली जाणार आहे.
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण
राज्यात एकीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशी विभागणी झाली असून शिवसैनिकांची देखील फाटाफुट झाल्याचे चित्र आहे. नुकतीचे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली. आता प्रतीक्षा असणार आहे ती विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात येणाऱ्या या प्रकरणातील निर्णयाची.
10 जानेवारीपर्यंत निर्णयाची अपेक्षा
दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर आणि उलट तपासणी आणि साक्षी नोंद दिल्यानंतर 10 जानेवारीपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे. दोन्ही गटाने आपल्या बाजू भक्कमपणे मांडली जावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला, लेखी युक्तिवाद सादर केले. आता निर्णय घ्यायची वेळ आहे विधानसभा अध्यक्षांवर. कारण अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राज्यासोबत संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे आणि हा निर्णय एक प्रकारे ऐतिहासिक ठरेल असं राजकीय आणि विधी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे या प्रकरणातील निर्णयाची.