Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण असणारच, श्रीराम तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची 'एबीपी माझा'ला माहिती
Ram Mandir : सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यामध्ये कोणत्या नेत्यांना निमंत्रण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राम जन्मभूमी (Ram Mandir) प्रतिष्ठापना समारंभाचे निमंत्रण असणारच अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने 'एबीपी माझा'ला (Abp Majha) दिली आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही पक्षांना निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.
दरम्यान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तसेच न्यायाधीशांना ज्यांच्या सुरक्षेचे प्रोटोकॉल लागू होतील, त्यांना निमंत्रण दिले जाणार नसल्याची माहिती देखील वश्वस्त मंडळाने दिली आहे. पण जे राजकीय पक्षांचे अध्यक्ष आहेत आणि विविध घटनात्मक पदांवर सुद्धा आहेत त्यांना निमंत्रण दिले जाणार आहे.
निमंत्रणावरुन नाराजी नाट्य?
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी म्हटलं होतं की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिलं गेलेलं नाही त्याचं कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिलं गेलेलं नाही. कारण आमचं त्याच योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत. ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार काही नाही अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. परंतु विश्वस्त समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
निमंत्रण पत्रिका नेमकी कशी आहे?
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी त्यांना निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही निमंत्रण पत्र
अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रण पत्रही पाठवण्यात आले आहे. हे पत्र 7000 लोकांना पाठवण्यात आले असून, हजारो भाविक येण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट देवाचा दर्जा मिळवलेल्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही रामलल्ला प्राण प्रतिष्ठानसाठी निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. त्यासोबतच विराट कोहलीलाही निमंत्रण पत्र पाठवण्यात आलं आहे.