(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bail Pola : वर्ध्यात नंदी पोळ्यासाठी लाकडी बैलांच्या विक्रीला सुरुवात; किंमतीत मोठी वाढ
विदर्भात मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात नंदी पोळ्यासाठी लाकडी बैल विक्रीला सुरुवात झाली आहे. लाकडी नंदी बैलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
Bail Pola : शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्त्वाचा असलेला सण म्हणजे बैलपोळा (Bail Pola). हा सण उद्या साजरा केला जाणार आहे. पोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्यांनी सजल्या आहेत. दरम्यान, विदर्भात या सणाला तान्हा पोळा किंवा नंदी पोळा म्हणतात. विदर्भात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात नंदी पोळ्यासाठी लाकडी बैल विक्रीला सुरुवात झाली आहे. लाकडी नंदी बैलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. लाकूड मिळत नसल्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.
एक बैलाची किंमत दोनशे रुपयापासून तर पंचवीस हजार रुपयापर्यंत
विदर्भात मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जातो. सद्या बाजारात मोठ्या प्रमाणात सागाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेले नंदी विक्रीस आले आहे. नंदी बनवायला आवश्यक असणारे सागाचे लाकूड पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यानं नंदी बैलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. एक बैलाची किंमत दोनशे रुपयापासून तर पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढली आहे. किंमत वाढली तरीही पालकांची लाकडी बैल खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.
पशुधनाची संख्या ही एक कोटी 39 लाख
शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलपोळ्याच्या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या सणावर लम्पी स्कीन आजाराचं सावट आहे. तर दुसकरीकडं पावसाचं प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. राज्याचा विचार केला तर सध्या पशुधनाची संख्या ही एक कोटी 39 लाख आहे. यामधील एक कोटी 10 लाख जनावरे ही वंशावळीची माहिती नसणारी आहेत. यातील 15 लाख जनावरे ही शुद्ध जातीची आहेत. तर उरलेली जनावरे 27 लाख जनावरे संकरीत आहेत. राज्यात म्हशींची संख्या ही 55 लाखांच्या आसपास आहे. राज्यात सात प्रकारच्या अधिकृत नोंदणी असलेल्या गायींच्या जाती आहेत.
पोळा सणावर महागाईसह लम्पी आणि दुष्काळाचं सावट
बैल पोळ्याचा सण यंदा महागाई सोबतच लम्पीच्या प्रार्दुभाव आणि दुष्काळाच्या सावटाखाली दबला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या (Bail Pola 2023) सजावटीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे दर विस ते तीस टक्क्यांनी वाढले आहे. विविध ठिकाणी भरलेल्या आठवडे बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने सजली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत दुकानदारासह खरेदीदारांची गर्दी जेमतेम असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या: