Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Maharashtra assembly Election Result 2024: राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या. मात्र, मनसेचा एकही आमदार निवडून आला नव्हता.
![Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक Raj Thackeray MNS meeting in Mumbai before mahayuti government oath taking ceremony in Mumbai Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/9faf26084d64bc8abb330b50c505c85a1710831560442426_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता मुंबईत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या हालचाली सुरु असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यातील 128 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही पराभव झाला होता. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही माहीम विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत मनसेची बैठक बोलावण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. मनसेचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि महायुतीमध्ये जवळीक वाढली होती. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यावर राज ठाकरे यांच्या मनसेला सत्तेत वाटा मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता भाजपला एकहाती 132 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजपला सत्तास्थापनेसाठी मनसेसारख्या घटकपक्षांची गरज उरलेली नाही. परंतु, आता राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची जाण ठेवून महायुती मनसेला सत्तेचा लाभ देण्यासाठी काही पावले उचलणार का, हे बघावे लागेल. त्यामुळे शिवतीर्थवरील मनसेची सोमवारची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
महायुती सरकारचा शपथविधी उद्या
महायुतीच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोमवारी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या राजभवनात किंवा वानखेडे स्टेडिअमवर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथ सोहळा संपन्न होईल. राजभवनाला शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी रविवारी संध्याकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेपूर्वी कोणाला किती मंत्रीपदं मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)