Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
Who is Amol Khatal : शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात थोरात यांचा पराभव केल्याने ते 'जायंट किलर' ठरले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला. महायुतीला 288 जागांपैकी 236 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला 49 जागांवर समाधान मानावे लागले. त्यातच संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात (balasaheb Thorat) यांचा धक्कादायक पराभव झाला. यामुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
बाळासाहेब थोरात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून (Sangamner Vidhan Sabha Constituency) तब्बल 40 वर्षांपासून निवडून येत होते. आतापर्यंत आठ वेळेस बाळासाहेब थोरात आमदार राहिले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीच्या निकालाने थोरातांना मोठा धक्का दिला. शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ (Amol Khatal) यांनी बाळासाहेब थोरात थोरात यांचा 10 हजार 560 मतांनी पराभव करत विजय मिळवला. अमोल खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 मते मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मते मिळाली. बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून अमोल खताळ हे 'जायंट किलर' ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात अमोल खताळ यांच्या बाबत...
कोण आहेत अमोल खताळ?
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून अमोल खताळ यांची ओळख आहे. विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर अमोल खताळ यांनी भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या मतदारसंघातून सुरुवातीला राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. यानंतर शिवसेना शंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अमोल खताळ यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत बोलायचे झाल्यास त्यांची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली होती. अमोल खताळ हे सुरुवातीच्या काळात संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांनी बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते म्हणून देखील काम केले आहे.
यानंतर अमोल खताळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. तेथे त्यांचे संगमनेरमधील ठेकेदारीच्या मुद्द्यावर मतभेद झाले होते. बाळासाहेब थोरात सामान्यांकडे दुर्लक्ष करून ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देतात, असा आक्षेप अमोल खताळ यांनी घेतला होता. काही काळानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांचे काम सुरु केले. विखेंनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद दिले होते. सामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळवून देत अमोल खताळ प्रभावी काम केलं होते. यामुळे संगमनेरमधून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांनी उमेदवारी दिली आणि अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केला.
आणखी वाचा